संगमनेर पुरोहित संघाकडून अमरधामला साहित्य

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या संगमनेर परिसरात कोरोना महामारीमुळे वाढत्या मृत्यू संख्येचे गांभीर्य व सर्व समाजाची गरज लक्षात घेऊन पुरोहित संघाच्यावतीने अमरधामला साहित्य रूपाने मदत करण्यात आली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी दिली आहे.

संगमनेरमधील जनतेची अंत्यसंस्कार विधीसाठी वाढती गरज ओळखून पुरोहित प्रतिष्ठान (संगमनेर पुरोहित संघ) यांनी अंत्यसंस्कारासाठी अत्यावश्यक असणार्या साधनांचे लोकार्पण केले आहे. यामध्ये चार स्टील बादल्या आणि दोन मोठ्या रक्षा पात्रांचा समावेश आहे, अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष संदीप वैद्य यांनी दिली आहे. यापूर्वीही पुरोहित संघाने बनवून घेतलेल्या धातूच्या दोन मजबूत शिड्या तसेच अमरधाम येथे विधीच्या वेळी आवशयक असलेल्या सहा बादल्या व नदी प्रदूषण रोखण्यासाठी सिमेंटचे तीन निर्माल्य कुंभ अमरधाम येथे देणगी स्वरूपात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. अंत्यसंस्कारासाठी दोन्ही शिड्या व सहा बादल्या सर्व समाजांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. नदीच्या प्रवाहात निर्माल्य टाकून दिल्याने आपल्या सुंदर आणि पवित्र प्रवरा नदीचे पाणी दूषित होते. ते टाळण्यासाठी पर्यावरण रक्षणाच्या भूमिकेतून पुरोहित संघाने संगमावर दोन सिमेंट निर्माल्य कुंभ बांधले आहेत. त्यात सर्वांनी निर्माल्य टाकून प्रवरेचा प्रवाह स्वच्छ राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी पुरोहित प्रतिष्ठान (संगमनेर पुरोहित संघ)चे कैलास जोशी, अरुण कुलकर्णी, दत्तात्रय बल्लाल, योगेश म्हाळस, अनिल मुळे, प्रमोद जोशी, चेतन मुळे, अजिंक्य मुळे, महेश मुळे, सागर काळे, विशाल जाखडी आदी सदस्य उपस्थित होते.
