लैंगिक शिक्षण काळाची गरज : आ.लहामटे
नायक वृत्तसेवा, अकोले
ज्या आई-वडिलांनी आपल्याला काबाड कष्ट करून लहानाचे मोठे केले, त्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना आपल्या एखाद्या कृतीने समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नये.एखादा निर्णय घेतांना ज्येष्ठांना विचारा, त्यांचा सल्ला घ्या असे आवाहन करतांना, लैगिंक शिक्षण अभ्यासक्रमात असण्याचा विचार पुढे आला होता, त्याला विरोध झाला पण आज ती काळाची गरज झाली आहे. शिक्षणात लैगिंक शिक्षण असावे असे मत आ.डॉ.किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

‘पळून जाण्यापूर्वी’ या अभियानाचा शुभारंभ अकोलेत करण्यात आला.यावेळी आ.डॉ.किरण लहामटे बोलत होते.श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत रविवारची शाळा यांच्या वतीने संस्थेचे प्रमुख आणि पत्रकार श्रीनिवास रेणुकदास यांच्या या संकल्पनेतून या मुलांसाठी रविवारची शाळा सुरू आहे.आज या उपक्रमा बरोबरच बालविवाह विरोधी अभियान, पळून जाण्यापूर्वी… ही विद्यार्थ्यांना प्रबोधन अभियान देखील सुरू करण्यात आले.या अभियानाचे एकूण २० शिलेदार देखील यावेळी उपस्थित होते. तसेच अकोले शहरातील वंचित, उपेक्षित, गरीब, एकल कुटुंबातील १२५ विद्यार्थी यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली. अकोले पंचायत समितीच्या सभागृहात आ. डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत होते तर व्यासपीठावर अर्थवेद पतसंस्थेचे चेअरमन प्रा.बी. एम. महाले, संगीत विशारद मुकुंद पेटकर, बुवासाहेब नवले मल्टिस्टेटचे चेअरमन विक्रम नवले, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, संटू आई देवस्थानचे अध्यक्ष डी. के. गोरडेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आ.डॉ.किरण लहामटे पुढे म्हणाले की, शारीरिक आकर्षणातून मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून आता हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.ज्या बापाची पोरगी पळून जाते, त्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही याचा विचार मुलींनी केला पाहिजे.या मुली एखाद पोरग मोटार सायकल रेस करून चालत, त्याला त्या भाळतात.आणि बळी जातात.व्यसनाधीन मुलांच्या नादी लागतात हे अत्यंत विदारक चित्र असून वयाच्या २० ते २५ पर्यंत ब्रम्हचर्य पाळले पाहिजे हे कोणी सांगतच नाही. त्याचे खूप फायदे आहेत. आता मुलींच्या देखील अवास्तव अपेक्षा आहेत. त्यामुळे आता सर्व बिघडायला लागले आहे.पळून जाण्यापूर्वी या अभियानाचा एक चांगला प्रोग्राम तयार करा.तालुक्यातील सर्व शाळा मध्ये प्रबोधन करुन, समुपदेशन करा.असेही आवाहन
लहामटे यांनी केले.

डी.के.गोरडे म्हणाले की, मुली पळून जाण्याचे अत्यंत विदारक चित्र असून रोज महाराष्ट्रात ७० मुली पळून जातात अशी माहिती समोर आली आहे.त्यातल्या फक्त १० टक्केच मुली मिळून येतात.मुली पळून जाणे ही पालकांची हतबलता आहे.मुलगी जेव्हा पळून जाते तेव्हा त्या मुलीच्या बापाला समाजात मान सन्मानाने वावरता येत नाही.पालकांचा आणि मुलांचा संवाद संपला असून तो वाढला पाहिजे.मुली पळून जाण्याची अनेक कारणे आहेत. कुटुंबात मान सन्मान न मिळणे,गरजा पूर्ण न होणे,पालकांनी मुलांचे म्हणणे ऐकावे, मुलींच्या भावना समजून घ्याव्यात.असेही गोरडे म्हणाले.

यावेळी प्रा.बी. एम.महाले, घनश्याम माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.प्रास्तविक श्रीनिवास रेणुकदास यांनी केले.यामध्ये त्यांनी अभियानाची माहिती दिली.सूत्रसंचलन रमेश खरबस यांनी केले. यावेळी मनोज गायकवाड, गणेश धुमाळ, मच्छिंद्र मंडलिक आदी उपस्थित होते.’पळून जाण्यापूर्वी’ अभियानाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील शाळा मध्ये प्रबोधन व समुपदेशन करण्यासाठी डॉ. उमा कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णीं,प्राचार्य अनुराधा पोखरकर, ॲड.मंगला हांडे, ॲड. सरोजनी नेहे, डॉ.अनुप्रिता शिंदे, अनुराधा आहेर, नयना पाडेकर , मंदाकिनी हांडे, प्रतिभा साबळे, जादूगार हांडे, वसंत आहेर, घनश्याम माने, रमेश खरबस, मुख्याध्यापक रावसाहेब नवले, गायकर, गणेश जोशी, विलास गोसावी, श्रीमती फापाळे, प्रतिभा साबळे, रूपाली रेणुकदास यांचा समावेश आहे.

जेव्हा एखाद्या गावात एखादी मुलगी पळून जाते, तेव्हा
अनेक पालक आपलीही मुलगी पळून जाऊ नये या भावनेतून मुलींचे बालविवाह लावतात.एक मुलगी पळून गेली का १० मुलींचे बालविवाह होतात.त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. मुलीनी आयुष्यात प्राधान्य क्रम ठरवावा.करियर की लग्न यामध्ये करियरला प्राधान्य द्यावे असे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी म्हणाले.

Visits: 123 Today: 2 Total: 1102307
