अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या ऑटोनॉमस प्रस्तावाला मान्यता! विद्यार्थ्यांना मिळणार प्रथम वर्ष बी.टेक साठी प्रवेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर

स्वायत्तेमुळे शैक्षणिक दर्जा, नाविन्यपूर्ण सर्वंकष उपक्रम व एकूणच विद्यार्थ्यांची रोजगार कौशल्य क्षमता वाढून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत अमुलाग्र बदल होतील असे प्रतिपादन अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांनी केले. अभ्यासक्रम निर्मिती मागील संकल्पना व शास्त्र संरचना परिणाम आधारित शिक्षण पद्धती म्हणजेच आउट कम बेस्ड एज्युकेशन, विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली यांची योग्य सांगड घालून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करून ध्येयपूर्ती करण्याची एक उत्तम संधी याद्वारे मिळाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितले.स्वायत्तता मिळाल्याने विद्यापीठाच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची ७० टक्के प्रवेशाची मर्यादा न राहता महाराष्ट्रातील सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम रचना, परीक्षा पद्धती, मूल्यमापन या मुख्य बाबींवर स्वायत्तता प्राप्त झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयांचा समावेश दरवर्षी वेळोवेळी करून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट वृद्धीसाठी मदत होणार आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकीला ऑटोनॉमसची मान्यता मिळाल्याने राज्यभरातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी.टेक पदवी प्रवेशाची संधी मिळून सर्वोत्तम व अत्याधुनिक शिक्षण संगमनेर सारख्या ग्रामीण भागात मिळणार आहे. अमृतवाहिनीचे अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित असल्याने आंतरराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या दृष्टीने दरवर्षी अभ्यासक्रमात बदल होतील व त्याद्वारे सद्यस्थितीतील प्लेसमेंट मध्ये यापेक्षाही जास्त पॅकेजच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी प्राप्त होणार आहेत. यासाठी कंपन्यातील इंटर्नशिप कौशल्य विकास प्रशिक्षण, जपानी व जर्मन भाषा प्रशिक्षण, इंग्लिश भाषा प्रशिक्षण या उपक्रमांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करून प्रत्येक पदवीधारास प्लेसमेंटच्या संधी देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी सांगितले.

