पाच वर्षांपासून फरार असलेल्या खुन्याच्या आवळल्या मुसक्या! संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची कामगिरी; चार महिन्यात पाच खुनाचे प्रकार उघड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाच वर्षांपूर्वी घुलेवाडीतील तामचीकर वस्तीत झालेल्या विवाहितेच्या खुनातील मुख्य सूत्रधारास पकडण्यात संगमनेर पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात एका महिलेला घटनेनंतर अटक करण्यात आली होती, मात्र यातील मुख्य आरोपी तेव्हापासून फरार होता. संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी तब्बल पाच वर्षांनंतर त्याचा माग काढीत त्याला नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यात उपअधीक्षक राहुल मदने यांनी उघड केलेला हा पाचवा खुनाचा प्रकार असून त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
याबाबत संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना पाच वर्षांपूर्वी 2 जानेवारी 2017 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील घुलेवाडीच्या कांजारभाट वसाहतीत घडली होती. येथील 35 वर्षीय विवाहित महिला सुषमा चंद्रकांत रोकडे यांनी आपली सखी असलेल्या भारती शेरसिंग तामचीकर हिला दोन लाख रुपये उसने दिले होते. त्यावरुन त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. विशेष म्हणजे त्या दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र पैशांच्या कारणावरुन त्यांच्या वितुष्ट निर्माण झाले होते.
त्यातून डिसेंबर 2016 मध्ये त्या दोघींमध्ये कडाक्याची भांडणे झाली, त्यावेळी सुषमा रोकडे यांच्या आई-वडीलांनी मध्यस्थी करीत ते मिटविली. मात्र त्यावेळी भारती तामचीकर या महिलेने सुषमा रोकडे यांना ‘तुला मी पाहून घेईल’ असा दम भरला होता. त्यानंतर महिन्याभरानंतर 2 जानेवारी 2017 रोजी रात्री साडेआठ वाजता सुषमा रोकडे आपल्या आईच्या घरी जेवायला आल्या. यावेळी बोलताना त्यांची बोबडी वळाल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याबाबत विचारणा केली असता भारतीने आपल्याला ज्युस प्यायला दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आपण दवाखान्यात जायचे का? असेही त्यांची आई म्हणाली, मात्र त्यांनी नकार दिला.
त्यानंतर काही वेळातच भारती तामचीकरही तेथे पोहोचली व तिच्यासोबतच सुषमा रोकडे आपल्या घराकडे निघून गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास सगळे गाढ झोपेत असतांनाच रात्री साडेअकराच्या सुमारास सुषमा रोकडे यांची दोन लहान मुले मोठ्याने रडत आपल्या आजीच्या घरी आली व आईला कोणीतरी मारल्याचे सांगू लागली. त्यामुळे सुषमाच्या आई-वडीलांनी जवळच असलेल्या आपल्या लेकीच्या घराकडे धाव घेतली असता कोणीतरी त्यांच्या तोंडावर व गळ्यावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे व त्यातच त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दृष्य त्यांना दिसले. सदरचा प्रकार खुनाचाच असल्याने पोलिसांनी त्याबाबत मयत विवाहितेची आई शहाबाई काशिनाथ यांच्या फिर्यादीवरुन भारती शेरसिंग तामचीकरसह अन्य एका अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा नोंदवून भारती तामचीकरला अटक केली होती, मात्र दुसरा अज्ञात असलेला आरोपी तेव्हापासून फरार होता.
संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी प्रलंबित गुन्ह्याचे तपास, वर्षोनुवर्ष पोलिसांपासून दूर असलेले आरोपी गजाआड करण्याचा सपाटा लावल्याने त्यातूनच या गुन्ह्यातील फरार आरोपीचा विषय समोर आला. त्यातूनच त्याचा कसून शोध घेतला असता तो नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात विखरणी येथे लपून बसल्याची माहिती त्यांना समजली. त्यावरुन त्यांनी आपल्या पथकातील पो.ना.अण्णासाहेब दातीर (संगमनेर तालुका), फुरकान शेख (श्रीरामपूर), पो.कॉ.अमृत आढाव व सुभाष बोडखे (दोघेही संगमनेर शहर), प्रमोद गाडेकर (घारगाव) व गणेश शिंदे (अकोले) यांना त्याच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर आरोपीला तब्बल पाच वर्षांनंतर गजाआड करण्यात आले आहे.