डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या ! अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची गुरुवारी निवड

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड गुरुवार दि. १९ जून रोजी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील काम पाहणार आहेत. यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आली आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने सर्व म्हणजे एकवीस जागा जिंकल्या. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड कधी होणार, याकडे अनेकांचे डोळे लागले होते. अखेर गुरुवार दि.१९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने बाजी मारल्यानंतर अरुण तनपुरे यांच्याकडेच अध्यक्षपद जाणार असल्याचे बोलले जात होते.त्यांच्याशिवाय कारखान्याचे चाक हलणार नसल्याची चर्चा सभासद, शेतकऱ्यांमध्ये होत होती, किंबहुना त्यांनाच जबाबदारी घ्यावी लागेल असेच वातावरण होते. कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे व कारखाना बचाव समितीचे अमृत धुमाळ यांच्या मंडळांचा दारूण पराभव झाला होता. शेतकरी सभासदांनी मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कारखाना संचालित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, श्री लक्ष्मी नारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संलग्न संस्थानची जबाबदारी कोणावर येऊन पडते, याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 157 Today: 1 Total: 1110669
