संगमनेरच्या पठारभागात वाळूतस्करांची दांडगाई! पथकाने दोन ट्रॅक्टर पकडले; दोघांनी दमदाटी करुन पळवले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका आणि वाळू तस्करी हे सूत्र नवीन नसले तरीही त्यातून समोर येणार्‍या घटना मात्र मजेशीरच असतात. अशीच एक मजेशीर घटना तालुक्याच्या पठारभागातून समोर आली आहे. तहसीलदारांच्या सूचनेनंतर कारवाईसाठी पोहोचलेल्या मांडव्याच्या तलाठ्यासह तिघांच्या पथकावर वाळूतस्कारांनीच दांडगाई करीत त्यांना कारवाईपासून रोखले आणि धक्काबुक्की करीत वाळूने गच्च भरलेले ट्रॅक्टरही पळवून नेले. या प्रकाराने भेदरलेल्या तलाठ्याने घडला प्रकार तहसीदारांना सांगितल्यानंतर या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात मांडव्यातील दोघा वाळूतस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतून संगमनेर तालुक्यातील वाळुतस्करांची मुजोरी ठळक होण्यासह तिघांच्या पथकाला दोन वेगळ्या घटनांमध्ये प्रत्येकी एकाला पकडता येवू नये यावरुन संशयही निर्माण झाला आहे.


याबाबत मांडवे बु. येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अभिषेक गोर्डे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.12) सकाळी साडेनऊच्या सुमारास मांडवे बु. येथील बाचकर वस्ती परिसरात वाळू उपसा सुरु असल्याची माहिती देत तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गोर्डे यांनी साकूरमधून महसूल सेवक असिफ शेख व शिवनाथ कातोरे यांना दुचाकीवर सोबत घेत मांडव्याचा प्रवास सुरु केला असता काही वेळात बाचकर वस्तीजवळून त्यांना विनाक्रमांकाचा एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह दिसला. त्याला थांबवून तपासणी केली असता त्यात गच्च वाळू भरल्याचे आढळले. यावेळी चालक गोरख भागा बाचकर याच्याकडे परवाना मागितला असता त्याने उडावा उडवी करीत पथकातील तिघांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करीत त्यांना न जुमानता ट्रॅक्टर घेवून तेथून पळ काढला.


या प्रकारानंतर कारवाईसाठी गेलेले पथक पुन्हा माघारी शिंदोडी रोडेने साकूरकडे येत असताना पुन्हा त्यांना निळ्या रंगाचा मात्र यावेळी पाठीमागे दोन चाकांची ट्रॉली असलेला ट्रॅक्टर दिसला. त्यालाही पथकाने थांबवून नाव, गांव विचारले असता त्याने दत्तु राधा बर्डे असे नाव सांगत आपल्याच मालकीचा ट्रॅक्टर असल्याची माहिती दिली. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर घारगाव पोलीस ठाण्यात घेण्यास सांगताच त्यानेही पथकाला शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांच्या देखत तेथून ट्रॅक्टरसह पळ काढला. या दोन्ही घटना संगमनेरच्या तहसीलदारांना सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही ट्रॅक्टरचे चालक आणि मालक यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.


त्यानुसार अभिषेक गोर्डे यांच्या तक्रारीवरुन घारगाव पोलिसांनी गोरख भागा बाचकर (चालक) व दत्तु राधा बर्डे (चालक व मालक, रा.मांडवे बु.) या दोघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 132, 303 (2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गांधले करीत आहेत. या घटनेने संगमनेर तालुक्यातील वाळु तस्करांची दांडगाई पुन्हा एकदा समोर आली असून महसूल प्रशासनाने अशा प्रवृत्ती विरोधात अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्याचीही शक्यता आहे.


एकाच दिवशी काही मिनिटांच्या अंतराने एकाच भागात घडलेल्या या दोन्ही प्रसंगांनी मांडव्याच्या तलाठ्यावर संशय निर्माण केला आहे. शासकीय वलय सोबत घेवून मांडवे बुद्रूकच्या तलाठ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन ट्रॅक्टर पकडले. यावेळी त्यांच्यासोबत अन्य दोघे तर समोर फक्त ट्रॅक्टर चालक होता. असे असतानाही दोन्ही घटनांमध्ये त्यांनी ट्रॅक्टरचालकाची दांडगाई नमूद केल्याने काहीसे आश्‍चर्य निर्माण झाले आहे. एरव्ही सर्वसामान्य शेतकर्‍यांना किरकोळ कामासाठी अक्षरशः नाकीनऊ आणणार्‍या महसूल विभागाच्या पथकाकडून एकट्या असलेल्या वाळू तस्करासमोर नांगी टाकण्याचा हा प्रकार संशयास्पद असून तहसीलदारांनी या घटनेची दुसरी बाजूही तपासण्याची गरज आहे.

Visits: 361 Today: 1 Total: 1413356

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *