नव्वदीतील पर्यटकाची कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई! ‘चिरतरुण गिर्यारोहका’चा उत्साह पाहून गिर्यारोहक झाले अचंबित..

नायक वृत्तसेवा, अकोले
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व आणि विचारांनी प्रभावित असलेल्या नव्वदीतील वृद्धाने तरुणांना लाजवेल अशी किमया केली आहे. अकोले तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच असेलेले कळसूबाई शिखर अगदी सहजासहजी चार तासांत सर केले. या मोहिमेत त्यांच्या सोबत असणारे सहकारी देखील या ‘चिरतरुण गिर्यारोहका’चा उत्साह पाहून अचंबित झाले होते. त्यांनी ही मोहीम फत्ते करत शरीर व मनाने धडधाकट असणार्‍या तरुणांना जणू गड-किल्ले चढण्याची नवचेतनाच दिली आहे.

अकोले तालुक्यातील कोतूळ गावचे रहिवासी असलेले व सध्या संगमनेर येथील साई निरंजन वसाहतीत वास्तव्यस असणारे आधार फाउंडेशनचे शिलेदार, निवृत्त प्राथमिक शिक्षक हरिभाऊ कोते (गुरुजी, वय 90) यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर अगदी सहजरित्या सर केले. गुरुजींनी नोकरीच्या काळात देवठाण, चैतन्यपूर, सुगाव यांसह अतिदुर्गम भागात आदर्श सेवा करत नावलौकिक मिळवला आहे. त्यावेळचे त्यांचे विद्यार्थीही आज चांगल्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरुजी निवृत्तीनंतर तब्बल बत्तीस वर्षे निवृत्तीवेतन घेत आपल्या कुटुंबांसमवेत उत्तम जीवन जगत आहेत. कामातील नियमितता व फिरणे यामुळे ऐन नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशी शरीराची ठेवण ठेवली आहे. नुकतीच संगमनेरमधील साई निरंजन वसाहतमधील कुटुंबियांनी कळसूबाई शिखर सहलीचे आयोजन केले होते. एक वर्षापूर्वी हरिश्चंद्र गडाची मोहिम फत्ते करणार्‍या कोते गुरुजींच्या जिद्द आणि शारीरिक क्षमतेवर विश्वास बसल्यामुळे त्यांचे या सहलीत येणे निश्चित झाले. संगमनेर तालुक्यात प्राथमिक शिक्षक असणारे त्यांचे चिरंजीव लक्ष्मण कोते यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कळसूबाई शिखरावर नेण्याचे धारिष्ट दाखवले.

आणि ठरल्याप्रमाणे मोहिमेस सुरुवात झाली. सर्वांनीच गुरुजींना चांगली साथ दिली. मजल दरमजल करत प्रवास सुरू होता. गुरुजींचे चालणे पाहून सर्वच अचंबित व्हायचे. सहलीतील इतर काही सदस्यांची संपूर्ण शिखर चढण्याची तयारी नसताना गुरुजींचे चालणे पाहून त्यांनाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली व त्यांनीही गुरुजींबरोबर शिखर सर केले. शिखर सर करण्यासाठी बर्‍याच हौशी पर्यटकांची गर्दी होती. त्यातील बरेचजण गुरुजींना उत्साह पाहून अचंबित होत असे. बाबा जमतं काय..? हळूच या.. थोडं थांबा.. एक फोटो / सेल्फी घेऊ द्या. कोते गुरुजी म्हणजे चक्क सेलिब्रिटी झाले होते. अनेकांनी गुरुजींसमवेत फोटो काढले. कोल्हापूर येथील जिममधील टीमने सांगितले, ‘बाबा आम्ही जिममध्ये तुमचा फोटो लावणार आहोत.’ काही प्रवासी तर अक्षरशः गुरुजींचे दर्शन घेत शुभेच्छा देत होते. चार तासांच्या अथक प्रवासानंतर सर्व साई निरंजन परिवार कळसूबाई शिखरावर पोहोचला. यावेळी गुरुजींचा आनंद गगनाला भिडला होता. देवीचे दर्शन घेताना अक्षरशः त्यांचे आनंदाश्रू वाहू लागले. खूप वर्षांचे अपूर्ण स्वप्न साकार झाले होते याचे वेगळे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. त्यांच्या मनातील तीव्र इच्छाशक्ती आणि कुटुंबाची साथ त्यांना कळसूबाई शिखरावर घेऊन गेली. शिखरावर पोहोचताच गुरुजींच्या मुखातून शब्द बाहेर आले, ‘आज माझ्या जीवनाचा कळस झाला’.

तीन वर्षांपूर्वी कोते गुरुजी, पत्नी व इतर नातेवाईक यांचे समवेत वैष्णोदेवीला जाऊन आले होते. तिथेही बत्तीस किलोमीटरचा पायी प्रवास गुरुजींनी कोणाचीही मदत न घेता पूर्ण केला होता .दरम्यानच्या काळात गुरुजी आपल्या कुटुंबासमवेत एकदिवसीय सहलीत शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, नाणेघाट येथेही जाऊन आले. वयाच्या नव्वदीमध्येही गुरुजींचे चैतन्स दिसत आहे. गुरुजींना उत्तम आरोग्याचे रहस्य विचारले असता ते सांगतात सतत कामात राहा, शरीराचे खूप चोचले, लाड करू नका. किरकोळ आजारांसाठी दवाखाना करू नका. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा असा सल्ला दिला. या यशस्वी मोहिमेबद्दल आधार फाउंडेशनचे सदस्य, शिवराष्ट्र हायकर्सचे सदस्य, मित्रमंडळी, नातेवाईक व तालुक्यातील शिक्षकांनी गुरुजींचे तोंड भरून कौतुक केले. तर गुरुजींनी सर्व सहकार्‍यांचे व कुटुंबाचे मनापासून आभार मानले.

Visits: 150 Today: 2 Total: 1112859

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *