मेंढवण येथील दारू विक्री बंदसाठी महिला आक्रमक पोलिसांनी दाद दिली नसल्याने गाठले ‘यशोधन’ कार्यालय

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील मेंढवण गावात अवैधरित्या सुरू असलेली दारूची विक्री त्वरीत बंद करावी. या मागणीसाठी संतप्त महिलांनी मंगळवारी (ता.19) संगमनेर तालुका पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा नेला होता. मात्र तेथे त्यांना दाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी थेट यशोधन कार्यालयावर मोर्चा नेत यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. त्यांनी तत्काळ पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना खडेबोल सूनावत तत्काळ कारवाई करण्यास सांगितले.

मेंढवण गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे गावातील अनेक तरुण व्यसनी झाले आहेत. तसेच दारुड्यांचा महिलांना मोठ्या प्रमाणात त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या 40 ते 50 महिलांनी थेट संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठले. मात्र महिलांना तेथे पोलिसांनी दाद दिली नाही. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा संगमनेरच्या उत्पादन शुल्क कार्यालयाकडे वळवला. तेथेही केवळ थातूरमातूर कारवाईचे आश्वासन दिले. या दोन्ही ठिकाणी त्या महिलांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा थेट माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाकडे वळविला.

आपल्या व्यथा कार्यालयाचे प्रमुख व थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या यांच्यासमोर मांडल्या. गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे दारुड्यांचा त्रास आम्हांला सहन करावा लागत आहे म्हणून तत्काळ दारू विक्री बंद करावी अशी मागणी महिलांनी थोरातांकडे केली. त्यावर राज्य उत्पादन शुल्क आणि तालुका पोलिसांना पाचारण करुन खडे बोल सुनावले. यावेळी संबंधित अधिकार्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, आगामी काळात कारवाई होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
