सिंचनाचा प्रश्न  सोडविण्यासाठी बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय! पाण्यापासून वंचित गावांचे होणार सर्वेक्षण :आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
तालुक्याच्या साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  मुंबईत जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली.या बैठकीत जलसंपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे. या माध्यमातून साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार आहे.
 या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख,रवी दातीर, ॲड.अमित धुळगंड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोरवाडी धरणाच्या संदर्भात अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती. याआधी भूसंपादनही झाले होते, मात्र धरण न झाल्याने जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली होती. २००४ मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमत्र्यांनी कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयाला पत्र देऊन जायकवाडीच्या खाली  कुठलेच धरण होणार नाही असे लेखी हमीपत्र राज्य शासनाच्या वतीने दिले गेले.परंतु साकुर पठार भागासह तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीत  सोडवायचा असल्याने आमदार अमोल खताळ यांनी यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला आहे.यानुसार  संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागासह तालुक्यातील निमोण  व तळेगाव या सर्व दुष्काळी भागाचे नव्याने सर्वेक्षण करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.तसेच सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर पुन्हा एकदा बैठक घेऊन या भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी  दिला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
या बैठकीत मोरवाडी धरणाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली, मात्र  मोरवाडी धरण होऊ नये यासाठी  मागच्या लोकप्रतिनिधींनी  खोडे घालून ठेवले होते, त्यामुळे आजपर्यंत ते धरण झाले नाही. मात्र मोरवाडी धरण झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्र या परिसरातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी बॅरेंज बंधाऱ्यांचा पर्याय पुढे आला आहे. हे बॅरेज बंधारे मोरवाडी, साकुर, जांबुत आणि शिंदोडी येथे बंधारे करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या माध्यमातून पठार भागाचा सिंचनाचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असे भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी सांगितले. तर रऊफ शेख म्हणाले, पहिल्याच अधिवेशनात साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी विधान सभेत मांडला. त्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांच्या माध्यमातून पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असुन सरकारची आणि लोक प्रतिनिधींची मानसिकता  सकारात्मक असल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले.
या बैठकीत निमगाव भोजापूर धरणाची उंची, पाणी नियोजन, व्यवस्थापन संदर्भातही चर्चा झाली असून, त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.निळवंडे डावा व उजवा कालवा, तसेच राहठीचा दरा येथे धरण बांधण्याच्या बाबतही विचार सुरू आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळणारच आहे असा ठाम विश्वास व्यक्त करतांना पाण्यापासून वंचित राहिलेल्या सायखिंडी, कऱ्हे व इतर सर्व गावाचा सर्वे करून भविष्यात एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही, यासाठी जलसंपदामंत्री विखे पाटील आणि मी स्वतः  प्रयत्नशील राहू असा विश्वास आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
Visits: 97 Today: 1 Total: 1105201

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *