जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगारांच्या नूतनीकराचा मार्ग मोकळा

जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगारांच्या नूतनीकराचा मार्ग मोकळा
समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या पाठपुराव्याला यश
नायक वृत्तसेवा, नेवासा
अगोदरच अनेक अडचणींनी घेरलेल्या असंघटित बांधकाम कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवलती देण्याची घोषणा केली गेली. मात्र ढिसाळ शासकीय यंत्रणा निष्क्रीय असल्याने सहकार्य करत नसल्याच्या तक्रारींची कामगार मंत्री दिलीप वळसे यांनी तातडीने दखल घेवून राज्याचे कामगार आयुक्त श्रीरंग यांना लक्ष घालून अहमदनगर जिल्ह्यातील कामगारांचे नूतनीकरण व नोंदणी तातडीने करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी दिली.


याविषयी अधिक बोलताना डॉ.घुले म्हणाले, कामगार मंत्री दिलीप वळसे यांच्याकडे कामगारांच्या होत असलेल्या हेळसांड व अडवणुकीबाबतची कैफीयत मांडत तातडीने लक्ष घालण्याची मागणी आपण केली होती. कोविडमुळे जी असामान्य परिस्थिती उद्भवली आहे ती तर सर्वश्रृत आहे. या पार्श्वभूमीवर आपण दोन हजार रुपयांचे अर्थ सहाय्य नोंदित बांधकाम कामगारांना देऊ केले आहे आणि आता मार्च अखेर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तीन हजार रूपये देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. कामगार कल्याण मंडळाकडे पाठपुरावा करुन देखील कामगरांच्या पदरात फारसे काही मिळत नसल्याने बांधकाम कामगार हे नूतनीकरण करण्यास अनुत्सुक असतात. आता नव्याने आलेल्या या योजनेत अटी-शर्ती आहेतच असे नमूद केले होते.


दोन हजारासाठी जानेवारी 2020 ला नूतनीकरण हवे तर तीन हजार रुपयांकरिता मार्च 2020 ला नुतनीकरण हवे. सध्या नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे नूतनीकरण ऑनलाईन करा असे सांगतात. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मात्र देत नाहीत. नोंदणीसाठी ना आयडी, ना पासवर्ड दिला जात आहे. मग मजुरांचे नूतनीकरण होणे अशक्य असल्याने त्यांना या योजनेचा फायदाही मिळणे अवघड झाले आहे. हीच अवस्था नवीन नोंदणीची आहे. या संदर्भात अनेकदा कामगार कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही पदरी निराशाच येत असल्याने अशीच अनास्था व तांत्रिक अडचणी कार्यालयाकडून सुरु राहिल्यास कामगारांचे कल्याण कसे साध्य होईल? हा प्रश्न आहे. मंत्री वळसे यांना मंत्रालयीन कामकाजाचा वकुब आणि अनुभव मोठा असल्याने त्याचा उपयोग केवळ अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील कामगारांना नक्कीच होणार आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नात आपण लक्ष घालून असंघटित कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी डॉ.घुले केली होती.


या प्रकरणाची मंत्री वळसे यांनी तातडीने दखल घेवून राज्याचे कामगार आयुक्त श्रीरंग यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. आयुक्त श्रीरंग यांनी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्याशी संपर्क साधून अहमदनगर कार्यालयाला सूचना दिलेल्या असून तातडीने कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याने कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल डॉ.घुले यांनी कामगारांच्यावतीने धन्यवाद दिले आहे.

Visits: 68 Today: 2 Total: 1101165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *