वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर २५२५ वटवृक्षांचे रोपण!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील १७१ गावे २५८ वाड्या व विविध वस्त्यांवर महिला भगिनींनी मोठ्या आनंदात व उत्साहात २५२५ वटवृक्षांचे रोपण व पूजन करून वृक्ष संवर्धनाचा राज्याला मंत्र दिला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान समिती व अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सहभागातून दंडकारण्य अभियान, पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनली आहे.प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी तालुक्यातील १७१ गावे २५८ वाड्या व विविध वस्त्यांवर २५२५ वटवृक्षांचे रोपण व पूजन महिलांनी केले. या वटवृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांनी उचलली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सत्व, श्रद्धा, आणि पतीपरायणतेचे प्रतीक असलेल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात.देशभरात मोठ्या उत्साहात सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा सण साजरा झाला. याच वेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी तालुक्यातील महिलांनी घेऊन राज्यापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

देवकौठे ते बोटा अशा १०६ कि.मी.लांबी असलेल्या विस्तीर्ण संगमनेर तालुक्यामध्ये सर्व महिलांनी देव वृक्ष असलेल्या वटवृक्षाचे पूजन व संवर्धन करून पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचा वाटा उचलताना राज्याला हिरव्या सृष्टीचा मंत्र दिला आहे. गावोगावी पारंपारिक पद्धतीने नटून-थटून महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. यावेळी विविध गावांमध्ये निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, मंदा सोनवणे, दिप्ती सांगळे, प्रीती फटांगरे,भाग्यश्री नरवडे,बेबी थोरात, मीनाक्षी थोरात, ममता गुंजाळ, पद्मा थोरात, शकुंतला सोसे, शितल उगलमुगले, मीरा शेटे,नंदा खेमनर, प्रतिभा जोंधळे, निशा कोकणे, लता गायकर, अनिता सोनवणे, यांच्यासह स्थानिक महिलांनी मोठ्या उत्साहाने वटवृक्षाचे पूजन केले.

भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेला मोठे महत्त्व असून वड हा दीर्घायुष्य वृक्ष आहे, तो मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असून आध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण वट पूजेसाठी आहेत. मागील दहा वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे रोपण व पूजन करत असतात. तालुक्यात झाडांचे संवर्धन करण्याची संस्कृती वाढली आहे. प्रत्येक घराच्या भोवताली वृक्षांसह परसबागा निर्माण झाल्या असून वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.प्रत्येक महिलेने दरवर्षी किमान दोन वृक्षांचे रोपण करावे असे आवाहन दुर्गा तांबे यांनी यावेळी केले.

तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला कळाले. आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणारे हे वृक्ष आहेत. त्यामध्ये वटवृक्ष, पिंपळ, उंबर, कडुलिंब हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने त्यांना आपण देव वृक्ष म्हणून संबोधतो. प्रत्येक महिलेने मुलांप्रमाणे वृक्षांची काळजी घेतली तर पर्यावरणाचा मोठा धोका आपण टाळू शकतो. ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे सजीव सृष्टीला मोठा धोका निर्माण झाला असून हा धोका टाळण्यासाठी वृक्ष रोपण संवर्धन व पर्यावरण जपण्यासाठी महिलांनी व युवक आणि युवतींनी या पुढील काळात काम करावे असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी केले. पेमगिरी येथील साडेतीन एकरवर असलेला महाकाय वटवृक्ष संगमनेर तालुक्याची ओळख असून या वटवृक्षाला ऐतिहासिक दर्जा मिळावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Visits: 137 Today: 2 Total: 1102285
