दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरची बाजारपेठ ग्राहकांसाठी सज्ज! व्यापार्यांना सामान्य ग्राहकाची प्रतीक्षा; चौकाचौकात वाहतूक व्यवस्थेचा मात्र बोजवारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांच्या कोविड खंडानंतर यंदा सर्वच सार्वजनिक उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मात सर्वत्र साजर्या होणार्या दिवाळी सणाची सध्या घरोघरी जोरदार तयारी आहे. यंदाच्या दिवाळीत नागरिकांचा मोठा उत्साह दिसत असल्याने संगमनेरच्या व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी शहरातील बाजारपेठ सजू लागली असून शनिवार-रविवार सुट्टीची संधी साधून चाकरमान्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र गेली दोन दिवस दिसून आले. मात्र दूध संघ, साखर कारखाना, विविध सहकारी संस्था व खासगी आस्थापनांकडून वितरीत होणारा पैसा अद्याप लाभार्थ्यांच्या हातात नसल्याने बाजारपेठा सज्ज झाल्या असल्या तरीही त्यांना अद्यापही सामान्य ग्राहकांची प्रतीक्षा आहे. एकीकडे बाजारपेठ सज्ज असल्याचे दिसत असताना दुसरीकडे शहरातील सर्वच रस्त्यावर वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचेही दृष्य दिसत असून ठराविक ठिकाणी पोलिसांची उपस्थिती सोडली तर संपूर्ण शहराची अंतर्गत वाहतूक व्यवस्था रामभरोसे असल्याचेही बघायला मिळत आहे.
संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अगदी शिवकालापासून येथील कापड, तेल-तुप, गुळ व भुसार मालाची मोठी पेठ म्हणून संगमनेरचा लौकीक आहे. शहरात ठोक व किरकोळ कापड, किराणा, तेल-तुप विक्रेत्यांची मोठी भरमार असून त्यांच्या माध्यमातून केवळ संगमनेरच नव्हेतर आसपासच्या तालुक्यांसह काही जिल्ह्यातील व्यापारीही संगमनेरातून ठोक भावात माल घेण्यासाठी येथे येतात. मुळा व प्रवरा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेल्या संगमनेर तालुक्याच्या बाजारपेठेत ग्राहकांचा विश्वास जपला जात असल्याने अनेक ठिकाणचे ग्राहक संगमनेरातच खरेदीला पसंदी देतात. हाच विश्वास सोबत घेवून गेल्या काही वर्षात संगमनेरात पारंपरिक व्यवसायांसह अनेक नामांकित कापड कंपन्यांची दालने, सुवर्ण पेढ्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व मोबाईलची असंख्य दुकाने यांची संगमनेरात दाटी झाली आहे.
मागील दोन वर्ष कोविडच्या भयात, आप्त-स्वकियांच्या मृत्यूच्या वेदनेत गेल्याने या कालावधीत साजर्या झालेल्या दिवाळी सणात नागरिकांचा उत्साह मर्यादित झाला होता. यंदा मात्र हे भय नाहीसे झाले असून नागरिक कोविडच्या जोखडातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे यावर्षी दिवाळीचा सण जोरदार पद्धतीने साजरा होईल असा अंदाज बांधून ठिकठिकाणच्या व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात माल भरुन आपली दुकाने सज्ज केली आहेत. दिवाळीचा सण अद्यापही आठवडाभर दूर असल्याने सहकारी दूध व खासगी दूध संघाकडून उत्पादकांना दिला जाणारा परतावा, साखर कारखान्यांकडून मिळणारे फरकाचे पैसे व बोनस यासह शहर व तालुक्यातील विविध खासगी उद्योग समूह, आस्थापना व सहकारी संस्थांच्या कामगार व भागधारकांना मिळणारे पैसे अजून बँकांमध्ये जमा झालेले नाहीत.
मात्र शहर व तालुक्यातील चाकरमान्यांच्या हाती पैसा आल्याने गेल्या दोन दिवसांत संगमनेरच्या कापडपेठेत त्यांची गर्दी दिसून आली. मात्र व्यापारी वर्गाला सामान्य ग्राहकांची प्रतीक्षा असल्याने एकीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने व दालने सजली असली तरीही त्यांना ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या बाजारात काही प्रमाणात गर्दी असली तरीही त्यात बहुतेक गर्दी ही केवळ कापड खरेदीची असून अजूनपर्यंत किराणा दुकानांमध्येही ग्राहकांचा फारसा वावर दिसून आलेला नाही. येत्या दोन ते चार दिवसांत वरील संस्थांकडून आपल्या भागधारक व कर्मचार्यांना पैसे दिले जातील त्यानंतरच बाजारात चैतन्य निर्माण होईल असे व्यापार्यांचे मत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आठवडाभर संगमनेरात मोठी गर्दी होते. त्यामुळे या गर्दीचे व त्यातून होणार्या वाहतूक कोंडीचे योग्य नियोजन होण्याची गरज असते. यावर्षी आत्तापर्यंत पोलिसांकडून असे कोणतेही नियोजन प्रत्यक्षात राबविले गेल्याचे दिसत नसल्याने मेनरोड, चावडी, गवंडीपुरा, सय्यदबाबा चौक, तेलीखुंट, बाजारपेठ, नगरपालिका या भागात बेशिस्तीचे प्रदर्शन घडू लागले आहे. सणांच्या कालावधीत फेरेविक्रेत्यांना व्यवसाय करु देणे अपेक्षित असले तरीही त्यांच्यामुळे वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहणेही आवश्यक आहे. मेनरोड, बाजारपेठ या भागात तीनचाकी व चारचाकी वाहने शिरणार नाहीत यासाठी रस्ते बंद करण्याचीही कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र प्रभारी अधिकार्यांच्या अधिपत्त्याखाली या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याने शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर गर्दीसोबत बेशिस्तीचेही दर्शन घडू लागले आहे.