बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वबळावर उभे राहावे : शालिनी विखे

नायक वृत्तसेवा, धांदरफळ
प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे, तसेच आलेल्या प्रत्येक संधीच सोनं करावं. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वबळावर उभे राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केले.

तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली, या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी ‘उत्सव माझ्या कुंकवाचा, वटसावित्री पौर्णिमेचा’ या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनिता कानवडे,वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाकमत बाबा तरुण मित्र मंडळाच्या सर्व तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.

शालिनी विखे पुढे म्हणाल्या की, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत रूढ होती. त्यामुळे आई-वडिलांकडून मुलांना योग्य संस्कार मिळत होते,मात्र आता विभक्त कुटुंबपद्धती झाली आहे, त्यामुळे संस्कार मिळणे कठीण झाले आहे. महिलांनी एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींना सहकार्य करावं, विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान-सन्मान द्यावा, असंही त्यांनी सांगितलं.पती गेला तरी महिला कुंकू लावू शकते, कारण तीही समाजाचा भाग आहे. मुलगाच वंशाचा दिवा नाही, मुलगी सुद्धा पणती आहे अन् ती कायम प्रकाश देत असल्याचे विखे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील,आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ,पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांच्या बरोबरीने सात फेरे मारले आणि या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त प्रत्येक महिलेला वडाचं रोप भेट दिले.महिलांच्या दृष्टीने वट पौर्णिमा हा सण महत्वाचा आहे. जसे हा वड वाढत गेला तसेच या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींनी एकत्रित येऊन परिवर्तन केले. त्यामुळे तुमच्या पाठीमागे मी व तुमचे भाऊ भक्कम उभे राहतील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी व्यक्त केला.

भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नी वैष्णवी उपरे, निलम कासार, वर्षां प्रतीक्षा दीक्षित, सविता दत्ता कासार, मनाली नवले यांचा तसेच बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचवणाऱ्या कविता खताळ यांचा वट वृक्ष देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. महिला पोलीस अनिता गुंजाळ,मीरा बिबवे, सविता सोळशे, शशीकला हांडे, शिला साबळे, सुवर्णा नवले, लता जाधव, सुषमा भांगरे, सविता रुपवते, प्रतिभा थोरात, लता जाधव, निशा धाडी, सुवर्णा नवले, माधुरी मुंडलिक या महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवर महिलांच्या हस्ते वडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

Visits: 70 Today: 3 Total: 1107423
