पिंपळगाव खांड मधून जवळे बाळेश्वर पाणीपुरवठा योजनेला पाणी देणे शक्य : पोखरकर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जवळे बाळेश्वर पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र हे पाणी देण्याबाबत चर्चा, विरोध याबाबतच्या बातम्या सध्या येत आहेत मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचे निवेदन आमदार अमोल खताळ यांना देत याची सर्व पार्श्वभूमी निवेदनातून जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गंगाधर पोखरकर यांनी मांडत आमदारांचे याकडे लक्ष वेधले आहे.

सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गंगाधर पोखरकर यांनी या संबंधीची सविस्तर वस्तुस्थिती निवेदनातून मांडली आहे. पठार भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवताना खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात. पिंपळगाव खांड धरणापर्यंत येणारी पाण्याचे आवक १०,५०० एमसीएफटी इतकी आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ६०० दशलक्ष घनफूट असून अत्यंत टंचाईच्या काळात २०० दशलक्ष घनफूट मृत साठ्या मधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येऊ शकते. यासाठी धरणावर गोडबोले गेट बसवून जादा पाणीसाठा उपलब्ध करता येईल. टंचाई काळात पठार भागाला अंदाजे १० दशलक्ष घनफुट इतकी पाण्याची आवश्यकता आहे. धरणामध्ये पठार भागातील डोंगराळ भागासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पठार भागातील पिण्याच्या पाण्याची तुट भागवण्याकरता हरिचंद्र गडाजवळ पश्चिमेकडील वाहणारे पाणी पूर्वेकडे वळवून भागवता येईल अथवा पठार भागातील एखाद्या जलाशयामध्ये दहा घनफूट पाणीसाठा करून उन्हाळ्यामध्ये ही तूट भरून काढता येईल. मुळा खोऱ्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू व पाण्याची किंमत जाणून असणारा आहे. पठार भागातील नळ पाणी पुरवठ्याला लागणारे पिण्याचे पाणी उपलब्ध जलनिष्पत्तीच्या मानाने नगण्य असल्याने पिंपळगाव खांड धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होईल असे चित्र दिसत नाही. २५ दशलक्ष घनफूट जादा पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होऊन मार्ग निघावा ही, सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन पठार भागातील जनतेला नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दिलासा द्यावा, अशी मागणी ही पोखरकर यांनी या निवेदनातून केली आहे.

सदर पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ११ गावांना व त्या जवळच्या वाड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी २०११ च्या जनगणनेनुसार १९,९२८ लोकसंख्या असून २०५३ सालची प्रास्तावित लोकसंख्या ३६,९२७ इतकी विचारात घेतली आहे. सदर योजनेसाठी जॅकवेल व पंप हाऊस पिंपळगाव खांड धरणातून घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप ३०० मिलिमीटर व्यासाचे असून २०५३ सालची पाण्याची गरज ०.४६३ दशलक्ष लिटर इतकी असणार आहे. यासाठी ५५ लिटर मानसी ही पाण्याची गरज विचारात घेतली आहे.

Visits: 176 Today: 2 Total: 1102269
