रस्त्याच्या कामासाठी अकोल्यात दोन तास रास्ता रोको कामासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रशासनाचे आश्वासन

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोलेत गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध प्रश्नांबाबत मोर्चे, आंदोलन व रास्ता रोको सुरू आहेत. आजही कारखाना रोडचे क्राँकिटीकरण करण्याच्या मागणीसाठी शहरवासियांनी महात्मा फुले चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक रोडावली होती. प्रशासनाने रस्त्याच्या कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

अगस्ति कारखान्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा दाट लोकवस्ती आहे. याचबरोबर अनेक दुकानेही आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन सतत रहदारी सुरू आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने विद्यार्थ्यांना आणि शेतमालाची वाहतूक करणार्‍या शेतकर्‍यांना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यातच नगरपंचायतची निर्मिती होवूनही हा रस्ता ना नगरपंचायत ना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत झालेला आहे. यामुळे निधी मिळवून काम करण्यास अनंत अडचणी येत आहे. यावरुन नेमका न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न कारखाना रोड परिसरातील नागरिकांना पडलेला आहे.

परंतु, या परिसरातील रहिवाशांकडून नगरपंचायत कर वसूल करत असल्याने सर्व सोयी-सुविधा पुरविणे ही नगरपंचायतचीच जबाबदारी आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या आंदोलनास अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी भेट देवून रस्त्याच्या कामासाठी लवकरच आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासोबत बैठक घेवून तोडगा काढू असे आश्वासन दिले. तर उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी सदर रस्त्यासाठी 12 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे सांगितले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचे निवेदन नायब तहसीलदार महाले, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्वीकारत रस्त्याच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Visits: 32 Today: 1 Total: 395313

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *