पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला संगमनेरच्या कसायांचा ठेंगा! बकरी ईदला गोवंशाची ‘कुर्बानी’ झालीच; अलिशान वाहनात एक टन ‘गोमांस’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाच्या बकरी ईदला कोणत्याही स्थितीत ‘गोहत्या’ होऊ देणार नाही असे सांगत जिल्हाभर छापासत्र आणि नाकाबंदीच्या माध्यमातून गोवंशाच्या वाहतुकीसह त्यांना जवळ बाळगण्यावरही कठोर निर्बंध आणले होते. त्यातून कत्तलीसाठी जाणाऱ्या शेकडो गोवंश जनावरांची सुटकाही झाली. गुन्हा शाखेसह जिल्ह्यातील 32 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून सलग सुरू असलेल्या या कारवायांमुळे यंदा गोवंशाशिवाय ‘कुर्बानी’ पार पडेल असे चित्रही निर्माण झाले होते. मात्र संगमनेरच्या कसायांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिलेल्या पहिल्याच आदेशाला ठेंगा दाखवला आहे. बकरी ईदच्या दिवशीच शेकडो गोवंशाच्या मानेवर सुरा फिरवून कापलेले तब्बल एक हजार किलो वजनाचे मांस घारगाव पोलिसांनी पकडले. धक्कादायक म्हणजे यावेळी गोमांस तस्करांनी ‘इकोस्पोर्ट’ या आलिशान वाहनाचा वाहतुकीसाठी वापर केला. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेला हुलकावणी देण्यात त्यांना अपयश आले. या कारवाईत वाहतूक करणाऱ्या मुंबईतील इमाम हुसेन शेखला अटक करण्यात आली असून तो ज्याच्यासाठी गोमांस घेऊन चालला होता त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे वाहन संगमनेरच्या बेकायदा कत्तलखान्यांमधून आल्याचा संशय घारगाव पोलिसांना आहे, त्या दृष्टीने तपासही सुरु करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात गोवंशाच्या कत्तलीवरुन जिल्ह्यातील सामाजिक सौहार्दाला नख लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या सोशल माध्यमांचा जमाना असल्याने एखाद्या छोट्याशा घटनेलाही काही क्षणात राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होते. अशावेळी पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली आहे. मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाला कुर्बानी देण्याची प्रथा असल्याने काही ठिकाणी गायींसह गोवंश अथवा बोकडांची कुर्बानी देतात. मात्र या वेळेच्या परिस्थितीचा विचार करता आणि संगमनेरसह काही ठिकाणी गोवंश कत्तलखाण्यांवरुन निर्माण झालेल्या तणावाच्या घटना विचारात घेऊन नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाच्या बकरी ईदला एकाही गोवंशाची कत्तल होणार नाही याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सक्त आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या जवळपास शंभर कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील 32 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन जून पासूनच संशयित ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली होती. संगमनेर शहरातही पोलिसांनी वारंवार भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड, जुना जोर्वे रोड, मदिनानगर अशा कितीतरी ठिकाणी छापासत्र राबवले. या कारवाईत कोठेही जनावरांचे कापलेले मांस आढळून आले नाही हे विशेष. सलग पाच दिवस शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 73 गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका झाली. त्यांना जीवदयाच्या आश्रयाला पाठवण्यात आले. हा सर्व मुद्देमाल 32 लाखांहून अधिक रुपयांचा असल्याने शहर पोलिसांनी त्याचा मोठा गाजावाजाही केला. आणि त्यानंतरच्या काही तासातच घारगाव पोलिसांनी संगमनेर शहर पोलिसांचा गोवंश कत्तल ‘मुक्त’ बकरी ईदचा दावा सपशेल खोटा ठरवला.

घारगाव पोलिसांनी मुळा नदीच्या पुलाजवळ नाकाबंदी केली होती. आज पहाटे तीनच्या सुमारास संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या एका राखाडी रंगाच्या इकोस्पोर्ट या आलिशान वाहनातून पाणी गळत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी वाहन चालकाला थांबण्याचा इशारा करीत वाहनाच्या पाठीमागील बाजूची तपासणी केली असता त्यात चोहोबाजूने प्लास्टिकचे आवरण लावून त्यामध्ये गोमांस भरल्याचे आढळून आले. त्याचे मोजमाप केले असता ते जवळपास एक हजार किलो असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी चालक इमाम हुसेन शेख (वय 28, रा. कोळीवाडा, मुंबई) याला अटक केली असून सदरचा माल ज्याच्यासाठी घेऊन निघाला होता त्या मुंबईच्या अजीम अन्सारीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक हजार किलो गोवंश मांसासह अलिशान इकोस्पोर्ट (क्रमांक एम.एच. 46/एक्स 6305) ही कार असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या पहिल्याच आदेशानंतर जिल्हाभरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या पाच दिवसांपासून एका मागून एक कारवाया सुरु असल्याने या वेळच्या बकरी ईदला जिल्ह्यात एकाही गोवंशाचा बळी जाणार नाही असे चित्र निर्माण झाले होते. मात्र ऐन ईदच्या दिवशीच उशिराने घारगाव पोलिसांनी शेकडो जनावरांच्या कत्तलीनंतर एकत्रित झालेले तब्बल एक टन वजनाचे गोवंशाचे मांस हस्तगत केल्याने संगमनेरच्या कसायांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशालाही ठेंगा दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visits: 394 Today: 1 Total: 1417165
