बेलापूर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय होणार बुधवारी! कोअर कमिटी निवडणार सतरा जणांचे मंडळ; प्रस्तावाला सर्वांची सहमती

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 डिसेंबर, 2020 रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन बेलापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. या सर्वपक्षीय प्रमुखांनी मांडलेल्या सूचनेला कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते गुरुवारी (ता.24) मान्यता देण्यात आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली बेलापुर बु. ग्रामपंचायतची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे. 17 जागांकरिता होणारी ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव बेलापूर पत्रकार संघाने गावातील नेते मंडळींसमोर मांडला होता. या प्रस्तावास सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी मान्यता दिल्यानंतर गुरुवारी (ता.24) पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा कोअर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीतही सर्वांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय एकमताने घेतला. या बैठकीत बेलापूर ग्रामपंचायत सदस्य निवडीबाबत ठोस अशी रुपरेषा ठरविण्यात आली.

पत्रकार संघाचे खजिनदार सुनील मुथ्था म्हणाले, सर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्याला मंडळाचे उमेदवारी अर्ज दाखल करुन 30 डिसेंबर, 2020 रोजी सर्व उमेदवारांची माहिती, उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अर्ज कोअर कमिटीकडे जमा करावा. या सर्व अर्जांतून सर्वानुमते सतरा सदस्य निवडण्यात येतील व उर्वरीत उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. हे सतरा जणांचे मंडळ हे गावकीचे मंडळ असेल. काहींनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर गावचे मंडळ विरुद्ध ते उमेदवार अशी लढत होईल. सर्व पक्ष, गट-तट विसरुन एकत्र होवून गावच्या निर्णयाविरुद्ध जाणार्‍या उमेदवारांविरोधात सर्वपक्षीय नेते मंडळी प्रचार करतील. या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शविली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, भाजपचे शहरप्रमुख प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, शिवसेना शहरप्रमुख अशोक पवार, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल, भाऊसाहेब दाभाडे, सुधाकर खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय डाकले, विक्रम नाईक, हाजी इस्माईल शेख आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनीवरुन या प्रस्तावास संमती दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, मारुती राशिनकर, रणजीत श्रीगोड, नवनाथ कुताळ, ज्ञानेश्वर गवले, दिलीप दायमा आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी आभार मानले.

Visits: 18 Today: 1 Total: 114587

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *