सलग दुसर्‍या दिवशीही पोलिसांची कसायांवर छापेमारी! ‘गोहत्ये’चा छुपा प्रयत्न; पंधरा गोवंश जनावरांना अभय..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोठेही ‘गोहत्या’ होणार नाही याची दक्षता घेण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील 32 पोलीस ठाण्यांच्या हद्दित संशयीत ठिकाणांवर छापासत्रासह जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. गेल्याकाही वर्षात बेकायदा कत्तलखान्यांचे शहर म्हणून कलंक लागलेल्या संगमनेरातही पोलिसांकडून आदेशाचे पालन केले जात आहे. मात्र कारवाई करताना कसाई सापडणार नाही याचीही काळजी घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळी शहर पोलीस व उपअधिक्षकांच्या संयुक्त पथकांद्वारे पाच ठिकाणी झालेल्या कारवायांमधूनही ही गोष्ट अधिक ठळकपणे समोर आली. सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून 14 मोठ्या गोवंश जनावरांसह एका वासराला अभय दिले गेले. यातील एकाही कारवाईत ज्यांच्या तावडीतून ती सोडवली गेली, त्या कसायांची नावे मात्र समोर आलेली नाहीत. त्यामुळे कारवाया करुनही शहर पोलिसांवरील संशयाचे मळभ अद्यापही कायम आहे.


सत्तांतर, निवडणूका, प्रशासकांचे राज्य आणि वेगाने बदलणार्‍या राजकीय परिस्थितीत जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची घडीही विस्कटली असून गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. गुन्ह्याच्या तपासांकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याने समाज विघातक प्रवृत्तींची हिम्मत वाढली आहे. चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार यांची एकामागून एक सुरु असलेली श्रृंखला तोडण्यातही पोलिसांना यश आलेले नाही. मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेकडूनच तपासाच्या नावाखाली लोकांना नागवण्याचा प्रकार समोर आला होता. त्या विरोधात दक्षिणेच्या खासदारांनी मोठा गाजावाजा करीत उपोषणही केले होते. दोन दिवसांनी झालेल्या तडजोडीत महिनाभरात कारवाईचे आश्‍वासन दिले गेले. मात्र आजवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सर्वश्रूत आहे. त्यातून कुंपनाकडूनच शेत गिळण्याची वृत्तीही वाढीस लागल्याने संपूर्ण जिल्ह्यातील व्यवस्थाच ढासळल्याची स्थिती असताना जिल्ह्याचा पूर्वानुभव असलेल्या सोमनाथ घार्गे यांनी अधिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.


संगमनेरच्या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या उच्चाटणाबाबत ठाम भूमिका मांडल्याचे दिसून आले. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात गोहत्यासारखा प्रकार घडल्यास सामाजिक सौहार्दाला नख लागेल याचा विचार करुन त्यांनी दोन दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सक्तीचे आदेश दिले. कोणत्याही स्थितीत ‘गोहत्ये’चा प्रकार घडता कामा नये असेही बजावण्यात आले. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांनीही कालपासून गोवंशाचा माग काढीत कत्तलखान्यांच्या परिसरासह संशयीत ठिकाणांवर धाडसत्र सुरु केले आहे. गुरुवारी भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड व मदिनानगरच्या परिसरातून नऊ गोवंशाची सुटका केल्यानंतर शुक्रवारीही (ता.6) शहर पोलीस व उपअधिक्षकांच्या संयुक्त पथकांनी पाच ठिकाणी छापे घालीत 14 मोठ्या जनावरांसह एका वासराची सुटका केली.


सायंकाळी पाचच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल हरिश्‍चंद्र बांडे यांच्या पथकाने रमाई गार्डनच्या पाठीमागील बाजूस असलेल्या काटवनातून, सोपान बाचकर यांच्या पथकाने बौद्ध स्मशानभूमीलगतच्या झाडांमधून तर, विशाल करपे यांच्या पथकाने मदिनानगरमधील म्हसोबाच्या काटवनातून प्रत्येकी तीन गोवंश जनावरांची सुटका केली. सायंकाळी उशिराने साडेसातच्या सुमारास पोलीस उपअधिक्षकांच्या पथकातील कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी मदिनानगर उर्दूशाळेच्या पाठीमागील काटवनातून चार आणि रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस नाईक राहुल डोके यांच्या पथकाच्या कारवाईत अलकानगर लगतच्या काटवनातून एका वासरासह चार गोवंशाची सुटका करण्यात आली. सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ या साडेचार तासांच्या कालावधीत संयुक्त पथकांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून एकूण 14 मोठ्या जनावरांसह एका वासराची सुटका केली. मात्र यातील एकाही कारवाईत जनावरांचा मालक असलेल्या कसायाचे नाव समोर आले नाही.

गेल्याकाही कालावधीत जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामागे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखाचा सहभाग असल्याचा आरोप करुन चक्क दक्षिणेतील खासदारांनी उपोषणही केल्याने जिल्ह्याची गुन्हेगारी राज्याच्या चर्चेत आली होती. गुन्ह्यांचे तपास बोकाळल्याने चोर्‍या, घरफोड्या आणि सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. भ्रष्टाचारातून अव्यवस्था वाढीस लागल्याने अवैध व्यवसायांचेही स्तोम माजले आहे. अशा स्थितीत जिल्ह्याचा पदभार घेणार्‍या पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटण करण्याचा ‘शब्द’ दिल्याने, त्याच्या पूर्ततेसाठी ते किती कठोर पावलं उचलतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 359 Today: 1 Total: 1421665

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *