जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकर्‍यांनी घरांवर लावले काळे झेंडे केंद्र सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार विरोधी धोरणांचा केला निषेध

नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्र सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.26) संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर व कामगार संघटनांच्यावतीने देशभर काळा दिवस पाळण्यात आला. नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकर्‍यांनी घरांवर, गाड्यांवर, ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावून निदर्शने केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या घरावर काळे झेंडे फडकावत मोदी सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन विविध संघटनांतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार हे आंदोलन झाले. यासंबंधी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी सांगितले की, ‘शेतकरी आणि कमगार विरोधी धोरणे घेणार्‍या केंद्र सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही अपयश आले आहे. सरकारने कोरोना परिस्थिती ज्या निष्काळजीपणाने हाताळली व लसीकरणाचा खेळखंडोबा केला त्याचाही आज देशभर घरांवर काळे झेंडे फडकवून निषेध करण्यात आला.’

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव अ‍ॅड.बन्सी सातपुते यांनी सांगितले की, ‘कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावून काळा दिवस पाळला. 26 मे रोजी मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. तर दिल्लीतील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला सहा महिने तसेच कामगार संपाला सहा महिने पूर्ण होत आहेत. या प्रश्नांवर जानेवारीपासून बोलणी थांबलेली आहेत. पोकळ घोषणा करावयाच्या मात्र कृती करायची नाही अशी भूमिका सरकारची आहे. तसेच लसीकरणामध्ये मोठी अनागोंदी सुरू आहे. शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, हमीभावाची तरतूद करा, चारही कामगार संहिता मागे घ्या, कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करा, डिझेल पेट्रोल भाववाढ मागे घ्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, सर्वांना मोफत लस द्या अशा अनेक मागण्यांसाठी हा निषेध दिवस पाळण्यात आला.’

अहमदनगर जिल्हा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एल. एम. डांगे तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव सुरेश पानसरे यांनी गेल्या आठ दिवसांपासून शेतकर्‍यांच्या भेटीगाठी घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. राहाता, नेवासा, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Visits: 154 Today: 2 Total: 1593984

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *