लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार संगमनेर तालुक्यातील प्रकार; गुन्हा दाखल होताच आरोपी पसार..

नायक वृत्तसवेा, संगमनेर
वर्षभरापूर्वीच गावात राहण्यासाठी आलेल्या तरुणाने दररोज संगमनेरला शिक्षणासाठी जाणार्या अल्पवयीन मुलीला हेरुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून वर्षभरात दोनवेळा संगमनेर बसस्थानकातून पुन्हा गावाकडे घरी नेवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध निर्माण केले. मुलीच्या कुटुंबात या प्रकरणाची वाच्चता झाल्यानंतर पीडितेने आम्ही लग्न करणार असल्याचे सांगत आपल्या वडिलांच्या मोबाईलवरुन आरोपीशी संपर्क केला. मात्र मुलीच्या घरी येवून तसे सांगण्यास टाळाटाळ करण्यासह काही वेळातच त्याने आपला मोबाईलही स्वीचऑफ केला. त्यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साडे सोळा वर्ष वयाच्या पीडितेने संगमनेर तालुका पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी आदित्य अर्जुन शेटे याच्या विरोधात अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या वर्षभराच्या कालावधीत घडला. गेल्यावर्षी पीडित मुलीच्या गावात राहाण्यासाठी आलेल्या आरोपी आदित्य अर्जुन शेटे याने दररोज महामंडळाच्या बसने संगमनेरला शिक्षणासाठी जाणार्या साडेसोळा वर्षाच्या अल्पवयीन पीडितेशी संगमनेर बस स्थानकावर ओळख निर्माण केली. त्यानंतर तो त्याच्या वेगवेगळ्या मित्रांच्या माध्यमातून सतत पीडितेशी संपर्क साधू लागला. गेल्यावर्षी 5 डिसेंबररोजी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे बसने संगमनेरला येताच तेथे आधीपासूनच हजर असलेल्या आरोपी आदित्य शेटे याने गोडगोड बोलून पीडितेला मोटर सायकलवरुन त्याच्या आई-वडीलांच्या घरी नेले. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जवळपास दोनतास घरातच घालवल्यानंतर आरोपीने ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे, आपण रोज भेटू’ असे सांगत तिला पुन्हा संगमनेर बसस्थानकावर आणून सोडले.

चार महिन्यांपूर्वी 15 एप्रिलरोजीही सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडित मुलगी बसने संगमनेरला येताच आरोपी आदित्य शेटे तेथे आला व त्याने मागीलप्रमाणे गोडगोड बोलून पीडितेला आपल्या दुचाकीवरुन पुन्हा त्याच्या आई-वडीलांच्या घरी नेले व पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून दुसर्यांदा शरीरसंबंध निर्माण केले. त्यानंतर पुन्हा बसस्थानकावर सोडतांना ‘आपण लग्न करणार आहोत, तु आपल्या संबंधाबाबत कोणाला काही सांगू नकोस’ असे म्हणत तो निघून गेला. चालू महिन्याच्या सुरुवातीला 1 जूनरोजी आरोपीने पीडितेला असेच बसस्थानकातून आपल्या दुचाकीवर बसवून शिर्डीलाही नेले व दर्शन करुन परत आणून सोडले.

दोन दिवसांनी या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या वडीलांना भणक लागल्यानंतर त्यांनी त्याबाबत आपल्या मुलीकडे विचारणा केली. त्यावेळी पीडितेने ‘आम्ही दोघं लग्न करणार आहोत’ असे उत्तर दिले. त्यावर त्याला फोन करुन इथे बोलवं व माझ्यासमोर विचार असे तिच्या वडीलांनी बजावल्यानंतर त्यांच्याच मोबाईलवरुन पीडितेने आरोपीला फोन केला व समक्ष बोलण्यासाठी लागलीच घरी येण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने ‘येतो’ असे म्हणतं वेळ मारली, मात्र पीडित मुलगी त्याला वारंवार फोन करु लागल्यानंतर त्याने ‘तु मला जास्त फोर्स करु नकोस, नाहीतर मी जीवाचे बरेवाईट करुन घेईल’ अशा धमक्या देत तो बोलण्यासही टाळाटाळ करु लागला. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात येताच आरोपीने आपल्याशी दोनवेळा शारीरिक संबंध ठेवल्याची बाब तिने आपल्या पालकांना सांगितली.

हा प्रकार ऐकून कष्ट करुन मुलांचे संगोपन करणार्या त्या शेतकरी दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र आत्ता या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास आरोपीचे मनोधैर्य वाढून तो आपल्या लेकीच्या आयुष्याचे मातेरं करेल या भयाने त्यांनी हिम्मत करुन तालुका पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपी आदित्य अर्जुन शेटे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64, 65 (1) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम चारनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर आरोपी पसार झाला असून तालुका पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अलिकडच्या काळात शाळा, महाविद्यालयाच्या निमित्ताने घराबाहेर पडणारी अनेक मुलं निर्जन ठिकाणी, हॉटेल अथवा लॉजमध्ये सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. संगमनेरातही हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावला असून बसस्थानकाच्या परिसरातील काही लॉजसह आजूबाजूच्या काही ठिकाणी मोठी रक्कम घेवून खोल्या उपलब्ध करुन देण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. या प्रकारांची पोलिसांसह पालकांनीही गांभीर्याने नोंद घेवून घरातून शिक्षणासाठी निघालेला पाल्य खरोखरी शिक्षणासाठीच जातोय की अन्य कशासाठी याची वेळोवेळी पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

