सोनेवाडीमध्ये ग्रामस्थांनी विद्युत मोटार चोरटे रंगेहात पकडले बेदम चोप दिल्यानंतर चोरीची कबुली; पोलिसांच्या केले हवाली
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
संशयावररून पकडून आणलेल्या दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर बेदम चोप दिल्यानंतर विद्युत मोटारीची चोरी केल्याचे कबुल केले. अरोपींनी चोरलेली मोटारही काढून दिली. ही घटना सोनेवाडी (ता.कोपरगाव) येथे घडली असून मुद्देमालासह ग्रामस्थांनी रमेश अंबादास कुदळे व सचिन रंगनाथ गांगुर्डे या दोन आरोपींना पोलिसांच्या हवाली केले. मोटारीमागे पाचशे रुपये कमिशन असल्याचे आरोपींनी ग्रामस्थांना सांगितले.
सोनेवाडी येथे रविवारी (ता.१७) गीताराम जावळे यांच्या शेतातील विहिरीवरून विद्युत मोटार दोन चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यावेळी चोरट्यांनी शेजारीच असलेले भाऊसाहेब मिंड यांच्याकडे रात्री बाराच्या दरम्यान तंबाखू मागितली होती. दुसर्या दिवशी विद्युत मोटार चोरी गेल्याचे सकाळी गीताराम जावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी मिंड यांना विचारणा केली असता रात्री तंबाखू मागणार्या त्या दोघांवर संशय व्यक्त केला. गीताराम जावळे यांनी मोटार चोर रमेश कुदळे व सचिन गांगुर्डे यांना मारुती मंदिरात आणून जोरदार चोप दिला.
चोप देताच त्यांनी गीताराम जावळे यांची मोटार चोरून आणण्याची कबुली दिली. चोरून आणलेली मोटार त्यांनी अनिल वायकर यांच्या गायीच्या गोठ्यात लपून ठेवली असल्याचे सांगितले. एका मोटारीमागे पाचशे रुपये कमिशन मिळत असल्याचे त्यांनी सागितले. पोलिसांच्या अगोदरच ग्रामस्थांनी चोरट्यांकडून गुन्हा केल्याचे कबूल करून घेतले. पोलीस पाटील दगू गुडघे यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. उपनिरीक्षक महेश कुशारे, गवसणे व पथकाने सोनेवाडी येथे येत ग्रामस्थांसमोर या चोरट्यांकडून मोटर कुठे ठेवली असल्याचे वदवून घेतले. अनिल वायकर यांच्या गोठ्यात ठेवलेली मोटार मारुती मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.