जून्या धाटणीतील लेखापाल बाळकिसन सारडा कालवश वयाच्या 88 व्या वर्षी निधन; आज सकाळी होणार अंत्यसंस्कार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जून्या धाटणीतले कसलेले लेखापाल, संगमनेरच्या माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर मर्चन्ट्स बँकेचे माजी व्हा.चेअरमन हरीश सारडा यांचे वडील बालकिसन भीकचंद सारडा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी मंगळवारी रात्री निधन झाले. गेल्याकाही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते, त्या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अतिशय प्रतिकूल स्थितीत प्रचंड संघर्ष करुन बालकिसन सारडा यांनी संगमनेरात आपले पाय रोवले. ओंकारनाथ भंडारी ऑईल मिलमध्ये अगदी लहानवयापासूनच त्यांनी सेवा सुरु केली. पुढे भंडारी यांनी त्यांच्या व्यवसायाचा संपूर्ण हिशोब ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. वयाच्या सत्तरीपर्यंत त्यांनी ती अव्याहतपणे पारही पाडली. या दरम्यान लेखापालसह त्यांनी व्यापारी, ग्राहक, मालक आणि सेल्समन अशा वेगवेगळ्या भूमिका वठवताना आपल्यातील अष्टपैलुत्वाचीही वेळोवेळी झलक दिली. अतिशय शांत आणि कार्यप्रवण असलेले सारडा धार्मिक आणि शांत वृत्तीचे होते. त्यामुळे एकदा त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ति हमखास त्यांच्या प्रेमात पडत.
हलाखीच्या स्थितीत संसाराचा गाडा हाकतानाही त्यांनी आपल्या दोन मुलांसह दोन्ही मुलींवर उच्च संस्कार केले. कवडी कवडी जमा करुन धनसंचय कसा करता येतो याचे मूर्तीमंत उदाहरण निर्माण करणार्या सारडाजींनी मुलांच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष होवू दिले नाही. त्यांचे ज्येष्ठ पूत्र सत्यनारायण नाशिकमध्ये वास्तव्यास असून कनिष्ठ पूत्र हरिश यांनी संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या संचालकपदासह उपाध्यक्षपदही भूषवले आहे. सर्वांशी गोड बोलणार्या, आस्थेवाईकपणे चौकशी करणार्या बालकिसन सारडा यांच्या निधनाने माहेश्वरी समाजाचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी भरुन निघणं शक्य नसल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
श्री.सारडा यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज (ता.4) पहाटे त्यांचे पार्थिव नाशिकहून संगमनेरला आणण्यात आले असून सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सारडा यांच्या निधनाबद्दल आमदार अमोल खताळ, उद्योगपती राजेश मालपाणी व ओंकारनाथ भंडारी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे
