पोलीस निरीक्षकाची कमाल; कारवाईसाठी येत असल्याची वाळू चोरांना दिली ‘खबर’ नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची थेट अहमदनगरच्या नियंत्रण कक्षात बदली

नायक वृत्तसेवा, नेवासा
वाळू तस्करांवर कारवाईसाठी निघणार्‍या पथकाची माहिती फुटते आणि कारवाई फसते, अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळे कारवाईसाठी निघालेली पथके आपली हालचाल गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर कोठे वाळू तस्कर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून पोलिस आणि महसूल पथकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. नेवासा तालुक्यात मात्र खुद्द पोलीस निरीक्षकानेच आपण कारवाईसाठी येत असल्याची ‘खबर’ वाळू चोरांना दिली. या संभाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या अधिकार्‍याची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. वाळू तस्करीसाठी बदनाम असलेल्या भागात या प्रकाराची मोठी चर्चा सुरू आहे.

नेवासा तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि वाळू चोर यांच्यातील संभाषण असल्याचे सांगत ही क्लीप व्हायरल झाली. यामध्ये पोलिस अधिकारी वाळू तस्कारला म्हणत आहे, पिंपळगावमध्ये उच्छाद मांडलाय तुम्ही. पलीकडून व्यक्ती म्हणते नाही सर आम्ही नव्हतो. नंतर पोलीस अधिकारी म्हणत आहे, जे कोणी असतील त्या नालायकांमुळे आता सगळ्यांनाच बंद करण्याची वेळ आली आहे. मी पोलीस स्टेशनमधून निघालोय. मी तेथे पोहोचायच्या आत जेवढी वाहने काढून घेता येतील, तेवढी काढून निघून जा. कायमस्वरूपी बंद करायचे आता. जोर्पंत मी पुढील आदेश देत नाही तोपर्यंत सगळे बंद. यावर पलीकडील व्यक्ती हो म्हणते. पोलीस अधिकारी पुढे म्हणतात, मी निघतो आहे. तोपर्यंत वाहने काढून घ्या. मी आल्यावर जेवढी वाहने तेथे असतील तेवढी जप्त करणार.

हे संभाषण नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे आणि एका वाळू चोरामध्ये झालेले असल्याचा दावा केला जात आहे. याची दखल घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी करे यांची तडकाफडकी नगरला नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागी नेवासा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. ही क्लीप बनावट असल्याचा दावा पोलीस निरीक्षकाने केला आहे, तर पोलिस अधीक्षक पाटील यांनी या प्रकाराच्या सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. याचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

Visits: 207 Today: 2 Total: 2122561

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *