रेमडेसिवीरचा अतिरेक नको ः डॉ.जमधडे
![]()
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी काहीअंशी प्रभावी ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या नातेवाईक रुग्णालाही देण्याचा अनेकांचा आग्रह असतो. त्यासाठी रुग्णालयात डॉक्टरांकडे आग्रह केला जातो. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर होतो. त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वसंत जमधडे यांनी केले. डॉ.जमधडे श्रीरामपूरच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे डॉ.जमधडे म्हणाले, कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असले, तरी ते कोणत्या रुग्णांना द्यावे. याबाबत राज्य शासनासह ‘आयसीएमआर’ने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आरटीपीसीआर तपासणीत कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी, तसेच रुग्णाची परिस्थिती पाहून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय संबंधित डॉक्टर घेऊ शकतात. कोरोना चाचणी न करता केवळ एचआरसीटी तपासणीच्या आधारे किंवा कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांना देखील हे इंजेक्शन देण्याचा आग्रह अनेकदा केला जातो. कोरोनाची लक्षणे नसलेले, अथवा सौम्य लक्षणे असलेले; मात्र शरीरातील ऑक्सिजन पातळी चांगली असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची फारशी गरज नसते. त्यामुळे नातेवाईकांनी, तसेच संबंधित डॉक्टरांनी देखील सरकारसह ‘आयसीएमआर’च्या सूचनांचे पालन करूनच रेमडेसिवीरचा वापर करणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.

रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला दिले म्हणजे रुग्ण तत्काळ बरा होईल, असा अनेकांचा समज आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शन हा कोरोना संसर्गावरील एकमेव उपाय नसून, केवळ उपचाराचा एक भाग आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळाले तरच आपला रुग्ण बरा होईल, असा विचार करणे चुकीचे आहे.
– डॉ.रवींद्र कुटे (राज्य उपाध्यक्ष, आयएमए)
