संगमनेर मर्चंट्सकडून स्वतःच्या पहिल्या घराचे स्वप्न साकार करा ः मालपाणी

संगमनेर मर्चंट्सकडून स्वतःच्या पहिल्या घराचे स्वप्न साकार करा ः मालपाणी
बँकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना व भारत पे अ‍ॅपचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘अनुदानाचा भरपूर लाभ असलेली आणि आणि माफक व्याजदरातही अनुदान देणारी प्रधानमंत्री आवास योजना सर्वांच्या हिताची आहे. या योजनेसाठी बँकेने विशेष 8.5 टक्के व्याजदर जाहीर केला असून 6.5 टक्के अनुदानानंतर तो फक्त 2 टक्के पडेल. त्यामुळे संगमनेर मर्चंट्स बँकेच्या माध्यमातून या योजनेसाठी इच्छुकांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा आणि या 6.5 टक्क्यांमुळे मिळणारी रुपये 2.67 लाखांपर्यंत अनुदान मिळवून आपले स्वप्नातील घरकुल साकारण्याची संधी मिळवावी’, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी केले.

मालपाणी क्लब अ‍ॅड रिसॉर्टसच्या हॉलमध्ये बँकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना व भारत पे अ‍ॅपच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.30) सायंकाळी संपन्न झाला. त्यावेळी बोलताना मालपाणी यांनी वरील आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सीए.नारायण कलंत्री, बांधकाम व्यावसायिक के. के. थोरात, उद्योजक सुरेश राजपाल, राष्ट्रीय योगासन खेळ महासंघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, बँकेचे उपाध्यक्ष संतोष करवा, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय योगासन खेळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.संजय मालपाणी यांचा विशेष सत्कार बँकेच्यावतीने करण्यात आला.

रिमोटचे बटन दाबून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्घाटन प्रमुख अतिथी सीए.नारायण कलंत्री यांच्या हस्ते तर भारत पे चे उद्घाटन के. के. थोरात यांच्या हस्ते आणि भारत पे च्या क्यू आर कोडचे प्रातिनिधीक वितरण सुरेश राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ना रोना इन करोना, अब कुछ करोना’ या भूमिकेतून आपल्याला नवीन योजनेसह प्रगतीचे पुढचे पाऊल टाकायचे आहे असे अध्यक्ष मालपाणी यांनी भाषणात सांगितले. ‘भारत पे’च्या माध्यमातून मर्चंट्स बँकेत खाते असणार्‍या सर्व व्यापार्‍यांना ग्राहकांच्या सोयीसाठी कोणताही खर्च न करता मोबाईलद्वारा पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली असून प्रत्येक व्यापार्‍याने बँकेकडून सत्वर क्यू आर कोड घ्यावा व दिवाळीत ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन त्यांनी केले. याचा वापर पूर्णतः विनामूल्य असून व्यापारी व ग्राहक दोघांना कोणताही खर्च येत नाही व झटपट पेमेंट होते याची माहिती त्यांनी दिली. व्यापार्‍याच्या खात्यात रक्कम जमा झाल्याबरोबर तसा मेसेज मर्चंट्स बँकेमार्फत सिस्टीमद्वारे मिळेल हेही त्यांनी सांगितले.

‘स्वतःचे घरकुल बांधू इच्छिणार्‍यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना वरदान ठरत आहे. देशातील मोजक्याच सहकारी बँकांचा या योजनेत समावेश आहे. त्यात मर्चंट्स बँकेचा समावेश झाला ही संगमनेरला देशपातळीवर बहुमान मिळवून देणारी बाब आहे, असे मालपाणी म्हणाले. योजनेत बँकेचा समावेश व्हावा यासाठी विद्यमान उपाध्यक्ष संतोष करवा व माजी उपाध्यक्ष गुरुनाथ बाप्ते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. बँकेच्या प्रगतीत बँकेचे आजी-माजी संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, मार्गदर्शक, कर्मचारी यांचे योगदान अनमोल असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सीए कलंत्री यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत व्याज बचतीबरोबर इनकम टॅक्सची बचतही होते याचे बारकावे अभ्यासपूर्ण रितीने सर्वांच्या समोर मांडले. राजपाल व थोरात यांनी बँकेच्या लोकाभिमुख उपक्रमशीलतेची प्रशंसा केली. बांधकाम व्यावसायिक अरविंद वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात चंदनमल बाफना यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.सचिन बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष करवा यांनी केले. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी बँकेचे आजी-माजी संचालक, बांधकाम व्यावसायिक व संबंधित, शहरातील व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

 

Visits: 193 Today: 1 Total: 1112997

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *