महाशिवरात्रीची अगस्ति यात्रा कोरोनामुळे रद्द
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या अकोले येथील अगस्ति आश्रम येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. परंतु, यंदा कोरोना महामारीमुळे 11 ते 12 मार्च असे दोन दिवस महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती अगस्ति देवस्थानचे अध्यक्ष अॅड.के.डी.धुमाळ यांनी दिली आहे.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना अध्यक्ष अॅड.धुमाळ म्हणाले, दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. किमान चार ते पाच लाख भाविक हजेरी लावतात. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शासनाच्या नियमांनुसार निर्बंध घालण्यात आले आहेत. या यात्रेसाठी मुंबई, पुणे, नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांबरोबरच राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. शिवाय मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील व्यापारी या यात्रेला आवर्जून आपले सामान विक्रीसाठी आणत असतात. मात्र यावर्षी तशी स्थिती नसल्याने व्यापार्यांनी व विक्रेत्यांनी आपली खेळणी, प्रसाद, रहाटगाडगे, पाळणे किंवा इतर कोणताही माल विक्रीस आणू नये, असे त्यांनी कळवले आहे. शिवाय यात्रेच्या दुसर्या दिवशी होणारा राज्यव्यापी कुस्त्यांचा हगामा देखील रद्द करण्यात आला असल्याचेही त्यांनी पत्रकारांना निदर्शनास आणून दिले. फक्त शासकीय नियमांच्या अधीन राहून अगस्ति आश्रमातील महाराजांची विधीवत पूजा-अर्चा व दर्शन हे उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महामारीची परिस्थिती ध्यानी घेऊन भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, तसेच ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष धुमाळ यांचेसह खजिनदार किसन लहामगे, सचिव सुधाकर शाळीग्राम, दीपक महाराज देशमुख, गुलाब शेवाळे, पर्बत नाईकवाडी, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक आदिंनी केले आहे.
