अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दोन महिने लैंगिक अत्याचार पठारभागातील धक्कादायक प्रकार; घारगाव पोलिसांकडून 24 तासात दोषारोपपत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागातील एका विद्यालयात शिक्षण घेणार्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन 18 मार्चरोजी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपी अज्ञात आणि पीडितेचा मोबाईल सातत्याने बंद असल्याने पोलिसांना परिश्रम करुनही यश मिळत नव्हते. अखेर तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती छोटासा दूवा लागला आणि त्यांनी तात्काळ झडप घालीत आरोपी उत्तम डोंगरे याच्यासह पीडित अल्पवयीन मुलीला थेट पाथर्डी तालुक्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडितेने घारगाव पोलिसांसमोर दिलेल्या जवाबातून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर दाखल गुन्ह्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे घारगाव पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या 24 तासांतच तपास पूर्ण करुन आरोपी विरोधात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी पठारभागातील एका गावात घडला होता. या परिसरात राहणारी 16 वर्षीय विद्यार्थीनी इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी 17 मार्चरोजी पठारावरील एका शाळेत गेली होती. मात्र दुपारी दोन वाजता पेपर संपल्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी आसपास चौकशी करण्यासह तिच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडेही विचारणा केली. त्यातून सदरील मुलीने पेपर दिल्याचे मात्र त्यानंतर ती कोठे गेली याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय निर्माण झाल्याने दुसर्या दिवशी रात्री पीडित मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी भारतीय न्यासंहितेच्या कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पीडितेच्या मोबाईल क्रमांकावरुन तिचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचा मोबाईल क्रमांक पठारभागातील ‘त्या’ शाळेच्या परिसरातच बंद झाल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

तेव्हापासून घारगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु होता. मात्र पीडितेचा ठावठिकाणाही मिळत नव्हता आणि परिसरातून एखादा मुलगा ‘गायब’ झाल्याचेही समोर आले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढलेले असतानाच तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती अगदीच छोटासा दूवा लागला. त्याची उकल करीत असताना पारनेर तालुक्यातील डोंगरवाडी येथे राहणारा उत्तम भाऊसाहेब डोंगरे (वय 26) हा इसमही घटनेच्या दिवसापासून ‘गायब’ असल्याची बाब समोर आली. त्यामुळे घारगाव पोलिसांनी आपले संपूर्ण लक्ष त्याच्याकडे केंद्रीत केले. मात्र दुर्दैवाने या संपूर्ण कालावधीत त्यानेही आपला मोबाईल क्रमांक बंद ठेवल्याने त्याचा माग काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र पोलिसांनी पीडितेचा तपास सुरुच ठेवला आणि अखेर आरोपी पाथर्डी तालुक्यातील अकोला परिसरात वावरत असल्याची माहिती पुढे आली.

संशयीताचा मागमूस लागताच तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मरभळ यांनी तात्काळ पाथर्डी गाठून अकोला येथून आरोपी उत्तम भाऊसाहेब डोंगरे (वय 26, रा.डोंगरवाडी, ता.पारनेर) याच्या मुसक्या आवळीत त्याच्या ताब्यातून अपहृत पीडितेची सुटका केली. दोघांनाही घारगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अपहृत मुलीने घारगाव पोलिसांसमोर घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानुसार आरोपीने त्याच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान असलेल्या पीडितेला आमिष दाखवून इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर संपताच फूस लावून बोलेरो वाहनातून पळवून नेले. त्यासाठी वापरण्यात आलेले वाहन आरोपी उत्तम डोंगरे याने जुन्नर येथील टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या व्यावसायिकाकडून मागवले होते व त्यापोटी त्याने साडेपाच हजारांचे भाडेही अदा केले.

या कालावधीत आरोपीने अकोला (ता.पाथर्डी) परिसरातील एका शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरचालक म्हणून नोकरीही मिळवली आणि तेथेच खोली भाड्याने घेवून तो पीडितेसह राहू लागला. या दरम्यान त्याने अपहृत मुलीवर जवळजवळ दररोज शारीरिक अत्याचारही केले. पीडितेच्या जवाबातून अत्याचाराचा प्रकार उघड होताच पोलिसांनी मंगळवारी (ता.13) आधीच्या अपहरणाच्या प्रकरणात भारतीय न्यायसंहितेचे कलम 65 (1) सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम 4, 8, 12, 17, 21 प्रमाणे वाढीव कलम लावून आरोपीची दोन दिवस पोलीस कोठडी मिळवली. आजरोजी (ता.14) त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होत असतानाच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा अतिशय जलदगतीने तपास करुन अवघ्या 24 तासांतच आरोपी विरोधात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. या घटनेने संगमनेर तालुक्याच्या पठारभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कायद्यानुसार कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या 90 दिवसांच्या आंत सक्षम न्यायालयासमोर दोषारोपपत्र दाखल करावे लागते. पठारभागात अपहरणातून लैंगिक अत्याचारापर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणात मात्र पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा तपास करीत मंगळवारी (ता.13) अपहृत मुलीसह आरोपीला शोधून काढले. त्यातून पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर दाखल प्रकरणातील कलमांमध्ये वाढ करुन पठारभागासह पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे जावून संपूर्ण तपास पूर्ण केला आणि अवघ्या 24 तासांतच संगमनेरच्या जिल्हा व सत्रन्यायालयात आजरोजी (ता.14) दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेत घारगाव पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

