‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडे’!; विखेंचा थोरातांवर जोरदार पलटवार! कारखान्याचे संस्थापक बदलल्याचा दावा; संगमनेरात येवून ‘त्या’ वक्तव्याचाही घेतला समाचार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खासदारकीच्या माध्यमातून यांनीही ३५-४० वर्ष काढली, त्यांना आम्ही दणादण मते दिली. कधी मागे पुढे पाहिले नाही. त्यांना साधा एक बसस्टॉप बांधता आला नाही. आज तेच आम्ही काय केले असा सवाल करीत असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी वडगाव पान येथील कार्यक्रमात विखेंचे नाव न घेता केली होती. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा संगमनेरात येवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला. यांनी तर संगमनेर कारखान्याचे संस्थापकच बदलले असा गंभीर दावा करीत आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठीच खासदारांच्या नावाचा वापर केल्याचा जोरदार पलटवार त्यांनी केला. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून सुप्त असलेला थोरात विरुद्ध विखे हा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे.

गुरुवारी (ता.९) सायंकाळी निळवंडे डाव्या कालव्यातील पाणी पोहोचल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडगाव पान येथील कार्यक्रमात थोरात यांनी विखेंवर शरसंधाण साधले होते. खोट्या केसेस करुन संगमनेरच्या लोकांना त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे. पण, आम्ही त्यांना पुरून उरु असे म्हणत थोरात यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जहरी टीका करताना तुम्ही संधीसाधू असून इकडे-तिकडे उड्या मारुन मंत्रीपदे मिळवली. पण, आम्ही आजही काँग्रेस पक्षाशी इमानदार राहिलो असे म्हणत त्यांनी त्यांच्या राजकीय निष्ठेवरही प्रश्न उपस्थित केला होता.

आम्ही राहात्यात चांगले करायला जातो, पण ते संगमनेर तालुक्यात दहशत माजविण्यासाठी व विकास रोखण्यासाठी येतात असा गंभीर आरोप करीत खासदारकीच्या माध्यमातून यांनीही ३५-४० वर्ष काढली आहेत. त्यांना आम्ही दणादण मते दिली. कधी मागे पुढे बघितले नव्हते. यांना याकाळात साधा एक बसस्टॉप बांधता आला नाही आणि आज तेच ‘आम्ही काय केले’ असा सवाल आम्हांला विचारत असल्याचा प्रहारही त्यांनी केला होता.

त्यांच्या या वक्तव्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असताना नाशिककडे जात असताना आज दुपारी ते संगमनेरच्या विश्रामगृहावर काहीकाळ थांबले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना थोरातांच्या ‘त्या’ वक्तव्यावरील प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत आपण पक्ष संघटनेला धरुन किती काम केले असा सवाल करीत तुमचे मेव्हणे लोकसभेला उमेदवारी करीत असताना तुम्ही कोणाला मते दिली ते सर्व जनतेला माहीत असल्याचे सांगितले.

मलाही ‘त्यांच्या’ पिताश्रींविषयी बोलता येईल, मात्र जी व्यक्ती हयात नाही त्याबाबत बोलणार नाही. संगमनेर साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होते. मात्र, यांनी आता दुसरेच संस्थापक तयार केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. आपण सुसंस्कृत संस्कृतीमध्ये वाढलो आहोत, संघर्ष आपला आहे. जुन्या लोकांना यात ओढून आपण काय साध्य करणार आहात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपण आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करतोय. खासदारांचे नाव घेऊन आपली अकार्यक्षमता लपविण्याचा प्रयत्न करीत आहात. याचाच अर्थ ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडे’ अशी आपली अवस्था झाल्याची जोरदार टीकाही महसूल मंत्री विखे यांनी थोरातांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. गेल्या २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे लोकार्पण झाले, तेव्हापासून विखे आणि थोरात यांच्यामधील राजकीय संघर्ष खदखदत होता. वडगाव पानच्या जलपूजनातून तो उफाळून बाहेर आला आहे. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून सुप्त असलेल्या संघर्षाची वात पेटली असून, ऐन दिवाळीत त्यातून उठणारे धुमारे दिसू लागले आहे.

आम्हीच मराठा आरक्षण देणार!
यावेळी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरुन सुरू झालेल्या आंदोलनाबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही मराठ्यांना कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, काँग्रेससह राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेने (ठाकरे गट) अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जरांगे यांच्याकडून सुरू असलेल्या निस्वार्थ आंदोलनाला आम्ही यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे आणि त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांच्या वक्तव्यातील विरोधाभासावर बोट ठेवीत त्यांनी राजकीय ‘कट’ मारताना नाव न घेता विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार आरक्षण या विषयावर काहीच बोलत नाही. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्यावे की स्वतंत्रपणे याविषयी त्यांनी भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे देखील अद्यापपर्यंत गप्प बसून आहेत. या सर्वांची आरक्षणाबाबत असलेली भूमिका यावरुन दिसून येते. मात्र, सरकारने मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्याचे आपले धोरण यापूर्वीच जाहीर केले असून ते दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

