संगमनेर शहर पोलीस चोरट्यांसमोर हतबल! चक्क पोलिसांची घरे फोडली; लक्तरं वाचवण्यासाठी तक्रार मात्र टाळली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या कानाकोपर्‍यात बोकाळलेल्या अवैध व्यवसायांनी शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असताना आता त्यात चोरीच्या एकामागून एक घडणार्‍या घटनांचाही समावेश झाला आहे. भररस्त्यात महिलांना गाठून धूमस्टाईल ओरबाडले जाणारे दागिने, बसस्थानकातील महिला प्रवाशांना लक्ष्य करण्यासह गावठाण व उपनगरातील छोट्या-मोठ्या चोर्‍या आणि दुचाकी चोरीचे नियमित प्रकार सुरु असतानाच चोरट्यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिले असून चक्क शहरातील जून्या पोलीस वसाहतीत राहणार्‍या तीन ते चार पोलीस कर्मचार्‍यांची घरं एकारात्रीत फोडली गेली आहेत. पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍या या घटनेनंतर वरीष्ठ अधिकार्‍यांनी त्याची गांभीर्याने दखल घेवून चोरट्यांचा माग काढण्याची गरज होती. मात्र आधीच उधडलेली लक्तरं वेशीवर जायला नको या विचाराने यातील एकही घटना कागदावर घेण्यात आली नाही. त्यातून पोलीस चोरट्यांसमोर हतबल असल्याचे भयानक वास्तव समोर आले असून संगमनेर शहराची सुरक्षाव्यवस्था ‘रामभरोसे’ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जून्या पोलीस वसाहतीत सदरचा धक्कादायक प्रकार घडला. ब्रिटीश साम्राज्यात उभारण्यात आलेल्या या वसाहतीत वरीष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसाठी प्रत्येकी दोन बंगल्यांसह अंमलदारांसाठी एकूण 64 खोल्या बांधण्यात आल्या होत्या. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या या सर्व वास्तू आजच्या स्थितीत अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असल्याने पूर्वी येथे राहणार्‍या अपवाद वगळता सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरात अन्यत्र भाड्याने अथवा घुलेवाडीच्या पोलीस वसाहतीत घरं मिळवली व इथून स्थलांतर केले. मात्र आजही या वसाहतीत जवळपास 20 पोलीस कर्मचारी आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून वास्तव्यास आहेत.


चारही बाजूने संरक्षक भिंत आणि दोन बाजूने प्रवेशद्वार असलेली ही वसाहत शहराच्या अगदी हृदयस्थानी साडेतीन एकर जागेत विस्तारली आहे. मात्र जुनाट घरांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी येथील घरांचा त्याग केल्याने कधीकाळी कर्मचार्‍यांच्या मुलांना खेळण्याच्या मैदानात आज शुकशूकाट जाणवतो. त्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाने गुन्ह्यातील जप्त वाहनांचे गोदाम म्हणूनही या परिसराचा दीर्घकाळापासून वापर सुरु केला आहे. त्यामुळे अधुनमधून या ठिकाणी वाळू तस्कर व दोन्ही विभागाच्या कर्मचार्‍यांचा तुरळक वावरही असतो. एव्हाना मात्र ‘त्या’ 20 घरांमधील एखाद दुसर्‍या माणसाच्या संचाराशिवाय दिवसरात्र या परिसरात अभावानेच मानवी वर्दळ दिसून येते. नेमकी हिच गोष्ट हेरुन चोरट्यांनी घराला कुलुप लावून कर्तव्यावर व लग्नकार्यासाठी गेलेल्या तीन ते चार कर्मचार्‍यांची घरे लक्ष्य केली.


या घटनेत चोरट्यांनी एका महिला पोलीस कर्मचार्‍याचे घरं तर अक्षरशः झाडून लुटून नेले. त्यात घरातील सर्व कपडे, भांडे, इलेक्ट्रिक वापराच्या वस्तू आणि चक्क किराणा मालाचाही समावेश आहे. तर, अन्य दोघा-तिघांच्या घरातून कपडे, भांडी आणि अन्य किरकोळ ऐवज असा हजारोंचा मुद्देमाल घेवून चोरांनी पोबारा केला. चक्क पोलिसांच्या वसाहतीत घडलेला हा प्रकार कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत वरीष्ठ अधिकार्‍यांनाही याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य आणि हा विषय उघड झाल्यानंतर त्याचा जनमानसावर होणारा परिणाम लक्षात घेता वरीष्ठांनी सदर प्रकरणाचा जलदगतीने तपास करुन चोरट्यांचा माग काढण्याची गरज होती. मात्र प्रत्यक्षात गेल्या कित्येक दिवसांपासून घडणार्‍या अशा एकाही घटनेचा तपास लावण्यात अथवा त्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी पोलिसांच्याच एकामागून एक घरात घडलेला हा प्रकार कागदावर घेण्याऐवजी तो दडवण्यातच धन्यता मानली. त्यातून वरीष्ठांनी पोलिसांची आधीच उधडलेली लक्तरं वेशीवर जाण्यापासून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला.


त्या दबावातूनच ज्या कर्मचार्‍यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला त्या सर्वांना हजारोंचे नुकसान होवूनही गप्प बसावे लागले. मात्र या प्रकाराची दबकी चर्चा कानावर आल्यानंतर त्याचा माग काढला असता त्यातून हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला असून शहराच्या विविध भागात धुमाकूळ घालणार्‍या चोरट्यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे आणि त्यासमोर पोलीस मात्र हतबल असल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे. या घटनेत शहर पोलिसच त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याने सर्वसामान्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ज्या शहरात पोलिसच सुरक्षित नाहीत, त्या शहरात सर्वसामान्यांचे काय? असाही प्रश्‍न उभा राहीला आहे.


सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या येथील पोलीस वसाहतीचे नूतनीकरण व्हावे अशी खूप जुनी मागणी आहे. सात वर्षांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील 187 शहरांमधील वसाहतींचा विकास करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आजच्या स्थितीत सदरची वसाहत मोडकळीस आली असून राहण्यास अयोग्य आणि धोकादायक झाली आहे. शहराच्या हृदयस्थानी साडेतीन एकर जागेत विस्तारलेल्या या वसाहतीची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पोलीस महासंचालकांना सोपवला होता. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने आजही शहर पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी परिस्थिती आणि चोरट्यांचे भय असतानाही मोडकळीस आलेल्या वास्तूत आश्रय घेत आहेत.

Visits: 417 Today: 2 Total: 1111053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *