कत्तलीच्या मार्गावर चालवलेल्या गायींना जीवदान! संगमनेरच्या बजरंग दलाची सजगता; कायदा राबवण्यात सरकार अपयशी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणाचे मनं दुखावले जावो अथवा भावना, त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं नाही अशा प्रकारची प्रवृत्ती स्थानिक कसायांमध्ये भिनल्याने वारंवार विरोध, आंदोलने आणि कारवाया होवूनही संगमनेरचे गोवंश कत्तलखाने सुरुच आहेत. धक्कादायक म्हणजे ज्या पक्षाचा विचार गायीला दैवताचे स्थान देतो, त्या पक्षाची राज्यात दशकभरापासून सत्ता असूनही त्यांनीच केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात सरकार वारंवार अपयशी ठरले आहे. आज पहाटेही असाच प्रकार घडला असून मंचरमधून दाटीवाटीने मालट्रकमध्ये कोंबून संगमनेरच्या कसाईवाड्याकडे निघालेल्या तब्बल 17 गायी बजरंगदलाच्या ‘सूचनेवरुन’ घारगाव पोलिसांनी सोडवल्या. या कारवाईत पोलिसांनी गायींसह एकूण 14 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करुन वाहतूक करणार्या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गायी संगमनेरच्या तौसिफ कुरेशीच्या वाड्यात पोहचवल्या जाणार होत्या. त्यावरुन शहरातील कत्तलखाने आजही बिनदिक्कतपणे सुरु असल्याचे पुन्हा एकदा ठळक झाले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मंचरमधून मोहंमद खालीद बेपारी याने एका मालट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने गायी कोंबून त्या संगमनेरकडे पाठवल्याची माहिती घारगावच्या बजरंगदलाला समजली. त्यांनी याबाबत आज (ता.8) मध्यरात्री एकच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्यात जावून मिळालेली माहिती सांगितली. त्यावरुन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी हेडकॉन्स्टेबल साईनाथ दिवटे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी आज गुरुवारी पहाटे एकच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी खालसा फाटा येथे नाकाबंदी लावून संशयीत वाहनाची प्रतिक्षा सुरु केली.

काही वेळातच माहिती मिळालेल्या वर्णनाचा टाटा कंपनीचा मालट्रक (क्र.एम.एच.25/यू.1455) पुण्याहून नाशिककडे येत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. यावेळी पोलिसांच्या तपासणीत ट्रकच्या पाठीमागील बाजूस अतिशय निर्दयीपणाने, दाटीवाटीने 17 गायी कोंबून भरल्याचे आढळले. त्याबाबत चालक बबन बाबुराव लोंढे (वय 42, रा.अवसरी, ओतूर) व त्याचा साथीदार दीन महंमद इनामदार (वय 22, रा.भैरवनाथ आळी, मंचर) या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवी केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी सदरचे वाहन घारगाव पोलीस ठाण्यात आणून वरील दोघाही संशयीतांची कसून चौकशी केली असता त्यातून वास्तव समोर आले.

सदरच्या गायी कत्तलीसाठी जात असून मंचर येथील जनावरांचा व्यापारी मोहंमद खालीद बेपारी याने एकूण 17 गायी गाडीत भरुन संगमनेर येथील तौसिफ कुरेशी या कसायाच्या वाड्यावर पोहोचवण्यास सांगितल्याची माहितीही त्यांच्याकडून समोर आली. या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी 25 हजार मूल्य असलेल्या 4 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 17 गायी आणि 10 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा मालट्रक असा एकूण 14 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून सर्व गायींना सायखिंडीच्या जीवदया गोरक्षणात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल गाडेकर यांच्या तक्रारीवरुन मंचरच्या बबन लोंढे आणि दीन इनामदार या दोघांवर महाराष्ट्र प्राणीसंरक्षण कायदा आणि प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात 2014 साली महायुतीचे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या ‘गो’ संरक्षण कायद्यात बदल करुन गोवंशीय जनावरांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून राज्यात गोवंश वर्णीय कोणत्याही जनावाराची कत्तल करण्यास पूर्णतः मनाई आहे. राज्यात संगमनेर मात्र त्याला अपवाद ठरले असून हा कायदा अस्तित्वात आल्यापासून आजवर येथील बेकायदा कत्तलखान्यांवर शेकडों कारवाया होवून हजारो गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका, लाखों किलो वजनाचे त्यांचे मांस जप्त करुन त्याची विल्हेवाट, जिवंत जनावरांची जीवदया मंडळात पाठवणी आणि शेकडों कसायांवर कायदेशीर कारवाई होवूनही हा व्यवसाय मात्र कधीही बंद झाला नाही. त्यावरुन स्थानिक हिंदुत्त्ववादी संघटनांनी वेळोवेळी निवेदने, आंदोलने आणि तक्रारीही केल्या. मात्र त्याचा कोणताही परिणाम ना संगमनेरच्या स्थानिक पोलिसांवर झाला, ना येथील कसायांवर. त्यामुळे राज्यात ज्यांनी गोवंश हत्याबंदी कायदा केला, त्यांच्या दहा वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत त्यांना ‘त्या’ कायद्याची अंमलबजावणी करता आली नाही, हे वारंवार सिद्ध झाले असून बुधवारी त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.

संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यात कापले जाणारे मांस केवळ मुंबई, छत्रपती संभाजीनगर व मालेगावपर्यत मर्यादीत नसून येथून थेट कर्नाटकातील गुलबर्गासह अन्य काही शहरांमध्ये नित्याने ते पाठवले जाते. या व्यवसायातून दिवसाकाठी एका कसायाला लाखोंची कमाई होत असल्याने त्यांच्याकडून आपापल्या वाड्यांवर व कत्तलीसाठी आणल्या जाणार्या जनावरांवर कोणतीही कारवाई होवू नये म्हणून यंत्रणांना लाखोंची खैरात वाटली जाते. चार वर्षांपूर्वी नवाज कुरेशी या कुख्यात कसायाच्या वाड्यावरील छाप्यात सापडलेल्या ‘लाल’ डायरीतून हा सगळा खेळ समोरही आला होता, मात्र ती ‘डायरी’ अनेकांच्या चेहर्यावरील बुरखे फाडणारी निघाल्याने नंतरच्या तपासात तिची पद्धतशीर विल्हेवाटही लावण्यात आली. त्यावरुन यंत्रणांना हाताशी धरुनच हा सगळा बेकायदा उद्योग सुरु असल्याचेही ठळकपणे समोर आले होते. त्यामुळे अशाप्रकारच्या कारवाया होवूनही संगमनेरातील कत्तलखाने कधीही बंद होवू शकलेले नाहीत.

