संगमनेरचे ‘ग्रामीण’ रुग्णालय आता झाले ‘उपजिल्हा’ रुग्णालय! सेवा, सुविधांसह शंभर खाटा; वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही चौपट होणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून ‘अखेर’ संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अवघ्या तीस खाटांची सुविधा असलेल्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आता शंभर खाटांची सुविधा निर्माण करण्यात येणार असून वैद्यकीय अधीक्षकांसह तीस वैद्यकीय अधिकार्यांचा फौजफाटा आणि सव्वाशेहून अधिक कर्मचारी रुग्णांच्या सेवेत असतील. यासाठी आवश्यक असलेले बांधकाम व पदनिर्मिती करण्यासही शासनाने मान्यता दिल्याने उपजिल्हा रुग्णालयाची संगमनेरकरांची मागणी अखेर मान्य झाली आहे.

महाराष्ट्राच्या अवर सचिव रोशनी कदम-पाटील यांनी 13 ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश काढले असून संगमनेर तालुक्यातील वाढती लोकसंख्या व तेथे सध्या अस्तित्वात असलेल्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी 2 नोव्हेंबर, 2020 च्या मागणीच्या संदर्भात आरोग्य सेवा आयुक्तलायाने पाठविलेल्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानुसार संगमनेरसह अकोले, सिन्नर व जुन्नर तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे म्हंटले आहे.

त्यामुळे सध्या 30 खाटांची क्षेमता असलेल्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात खाटांची संख्या शंभर होणार आहे. त्यासोबतच शासनाने वाढीव इमारतींची आवश्यकता असल्यास त्याच्या बांधकामाला आणि वाढीव पदनिर्मितीलाही परवानगी दिल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील इमारतींची संख्या वाढून वैद्यकीय अधिकार्यांसह विविध थेरपी, तंत्रज्ञ, अत्याधुनिक प्रयोगशाळा व त्यात काम करणारे तंत्रज्ञ व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, नर्सिंग स्टाफ अशा सगळ्या गोष्टी चौपट संख्येने वाढणार आहेत. त्याचा संगमनेर व अकोल्यासह सिन्नर, जुन्नर व कोपरगाव तालुक्यालाही मोठा लाभ होईल.

नव्याने मान्यता मिळालेल्या संगमनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात आता वैद्यकीय अधीक्षकांसह जवळपास 25 ते 31 वैद्यकीय अधिकार्यांचा फौजफाटा असेल. त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, ओषधी तज्ज्ञ, जनरल सर्जन, फॉरेंयिक तज्ज्ञ, आयुष तज्ज्ञ, विकृती चिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, एक्स-रे व सोनोग्राफी तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. यापूर्वी वैद्यकीय अधीक्षकांसह केवळ चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच दंतचिकित्सक हे ‘नवीन’ पदही निर्माण करण्यात येवून त्याला मान्यता मिळाली आहे. याशिवाय जवळपास तीस नर्सेस, पाच सिस्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कर्मचारी मिळून 73 ते 72, शस्त्रक्रिया विभागासाठी स्वतंत्र चार कर्मचारी, रुग्णालयाच्या व्यवस्थापनासाठी सहाय्यक व्यवस्थापकासह 12 ते 15 कर्मचारी, याशिवाय रक्त पुरवठा विभागासाठी नव्याने आठ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाला ‘उपजिल्हा’ रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने दुष्काळी भागातील गोरगरीबांना त्याचा मोठा फायदा मिळणार आहे.

संगमनेर तालुक्याची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात घुलेवाडी व साकूर येथे ग्रामीण रुग्णालये असून तालुक्यातील दहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तालुक्याचे स्वास्थ्य नियंत्रणात ठेवले जाते. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयावरील वाढता ताण लक्षात घेवून येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी संगमनेरकरांची जुनी मागणी होती. मध्यंतरी शासनाने जिल्ह्यातील काही ग्रामीण रुग्णालयांना ‘उपजिल्ह्याचा’ दर्जा दिला तेव्हाही संगमनेरकरांचा हिरमोड झाला होता, मात्र संगमनेरच्या नेतृत्त्वाने आपला राजकीय ‘कस’ लावून त्या निर्णयानंतरही घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.

