शिवसेना कार्यालयाच्या शुभारंभातून ‘उबाठा’ला खिंडार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती; शहरासह तालुक्यातील अनेकांचा पक्षप्रवेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ‘अपक्ष’ आमदार सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी संगमनेरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातून भाजप व संघामधील निष्ठावान संभ्रमित अवस्थेत असतानाच आमदार अमोल खताळ यांनी शिवसेना विस्ताराचे काम हाती घेतले आहे. मंगळवारी काही गावांच्या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता त्यांनी शहरातील ‘उबाठा’ गटाच्या नाराजांना गोंजारण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभाचा मुहूर्त निश्चित केला आहे. या कार्यक्रमाला खूद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यावेळी ‘उबाठा’ गटाला खिंडार पाडून अनेकांचे पक्षांतर होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यासर्व घडामोडींचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार असून आमदार तांबे यांचा पक्षप्रवेश भाजपमधील नाराजीही शिगेला पोहोचवणारा ठरणार हे निश्चित आहे.

स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक बलवान असलेल्या शिवसेनेत गेल्या दशकभरापासून मोठी बेदिली माजली आहे. राजकीय महत्त्वकांक्षेतून पक्षाचा ताबा घेणार्या काही पदाधिकार्यांनी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विचार रुजवणार्यांनाच लक्ष्य करुन त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने पक्षातील जून्या शिवसैनिकांची मुस्कटदाबी सुरु झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्षात वाढत असलेल्या विस्कळीतपणाकडे दुर्लक्ष केल्याने असंख्य शिवसैनिक दुखावले गेले. त्यातच 2019 मध्ये पक्षाने विचारधारा टांगणीला ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी स्थापन केल्याने पक्षातील नाराजांच्या संख्येत अधिक वाढ झाली. या स्थित्यंतरातून मुखवटे धारण केलेल्यांना उघड भूमिका घेण्याची संधी प्राप्त झाल्याने निष्ठावान कार्यकर्ते शिवसेनेपासून अधिक लांब होत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने अशाकाही नाराजांना विचारांची जागा मिळाली खरी, मात्र बहुतेकांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारुन राजकारणापासून अंतर साधले.

दुसरीकडे सिटीझनविल पुस्तकाच्या प्रकाशनातून तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याची संधी मिळालेल्या सत्यजीत तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने राजकीय अन्याय केल्याची भूमिका घेत अपक्ष उमेदवारी दाखल केली. तेव्हापासूनच त्यांचा राजकीय प्रवास निश्चित झाल्याचे मानले जावू लागले होते. या निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट आपल्या मतदारसंघातील विविध कामे घेवून उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आणि कधीमधी सागर निवास्थानीही त्यांचा वावर वाढल्याने देवेंद्र फडणवीस त्यांचा ‘ब्रह्मास्त्रा’सारखा वापर करतील का? अशाही राजकीय वावड्या उठल्या. विशेष म्हणजे पदवीधरच्या निवडणुकीत थोरातांचे पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या विखे-पाटलांनीही त्यांना साथ दिली होती. त्यातून जिल्ह्याच्या राजकारणाचे बदलते चित्रही समोर आले.

सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा अनपेक्षित पराभव झाल्यापासून संगमनेर मतदारसंघातील राजकीय संघर्षाला नवीन धार आली आहे. विशेष म्हणजे तब्बल अडीच दशके काँग्रेस विचारांशी बांधील राहिलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीनंतर संगमनेर तालुक्याला डोळ्यासमोर ठेवून राजकीय सक्रियता वाढवण्यासह भगव्या झेंड्याकडे कलायला सुरुवात केल्याने स्थानिक भाजपमधील अस्वस्थताही वाढत होती. अशातच गेल्याकाही दिवसांत त्यांच्या थेट भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्याने गेल्या अनेक दशकांपासून थोरात-तांबे यांना राजकीय विरोध करीत आयुष्य खपवणार्या भाजपमध्ये संभ्रम आणि निराशा निर्माण होवू लागली आहे. सोशल माध्यमातून त्याचे प्रतिबिंबही उमटण्यास सुरुवात झाल्याने स्थानिक भाजपमधून त्यांच्या नावाला विरोध असल्याचे ठळक होत असताना निर्माण झालेल्या अवस्थेचा पुरेपूर फायदा घेत शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी पक्षाच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे.

मंगळवारी (ता.29) तालुक्यातील संगमनेर खुर्द, निमगाव, रायतेवाडी, झोळे अशा वेगवेगळ्या गावांमधील काही आजी-माजी पदाधिकार्यांसह उबाठागटातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील दुखावलेल्या निष्ठावान शिवसैनिकांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचेही चित्र असून उबाठागटाला एकाचवेळी चोहोबाजूने खिंडार पाडण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभाचा मुहूर्त ठरवण्यात आला असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच उपस्थितीत आजच्या स्थितीत अडगळीत गेलेल्या निष्ठावानांसह उबाठाच्या असंख्य शिवसैनिकांचा शिंदेगटात जाहीर प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे आगामी काळात आमदार सत्यजीत तांबे यांचा भाजप प्रवेश झाल्यास त्या पक्षातून दुखावलेल्यांनाही शिवसेनेत घेण्याचे नियोजन होत असल्याने येणार्या काळात संगमनेरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची दाट शक्यता आहे.

कडव्या हिंदुत्त्ववादी विचारांना प्रभावित झालेल्यांनी पाच दशकांपूर्वी तालुक्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवली. मात्र सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संघटनेत विस्कळीतपणा वाढण्यासह जुना-नवा असा वाद निर्माण होवून तो विकोपाला गेला, त्यातून दुखावलेले मूळचे शिवसैनिक अडगळीत जावून त्यांच्या जागा मुखवटे धारण केलेल्यांकडे गेल्याने संगमनेर तालुक्यातील उबाठाचे अस्तित्व टांगणीला लागल्याचे चित्र होते. अशा नाराजांवर लक्ष केंद्रीत करुन आमदार अमोल खताळ यांनी त्यांना गोंजारण्यास सुरुवात केल्याने आगामी कालावधीत उबाठागटाला अस्तित्वासाठी झगडावे लागण्याची शक्यता आहे.

