आमदारांकडून कानउघडणी होताच पोलीस अॅक्शनमध्ये! अलिशान कारमधून गोमांस वाहतूक; शहर पोलिसांचा खोटारडेपणा उघड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दित बोकाळलेले अवैध धंदे आणि वाढलेल्या गुन्हेगारीवरुन सोमवारी आमदार अमोल खताळ यांनी पोलिसांची कानउघडणी केल्यानंतर लागलीच त्याचा पहिला परिणाम समोर आला. मात्र घारगाव पोलिसांच्या या कारवाईने शहर पोलिसांचा खोटारडेपणाही उघड झाला असून शहरातील कत्तलखाने बंद असल्याचा त्यांचा दावाही फोल ठरला आहे. सोमवारी सायंकाळी मुळानदीच्या पुलावर सापळा लावून करण्यात आलेल्या या कारवाईत फोर्ड कंपनीच्या अलिशान कारमधून वाहून नेले जात असलेले तब्बल सातशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणात पारनेर तालुक्यातील दोघांवर भारतीय न्यायसंहितेसह महाराष्ट्र प्राणीसंरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार संगमनेरातील कत्तलखान्यांमधून भरलेले गोवंशाचे मांस घेवून अलिशान फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट कार पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती घारगावचे निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या पथकाला पाचारण करीत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हवालदार साईनाथ दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांनी घारगावच्या मुळानदी पुलावर सापळा लावला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिळालेल्या वर्णनाचे वाहन (एम.एच.01/बी.के.3545) नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जाणार्या लेनवर येत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला.

त्यानुसार वाहनचालकाने पोलीस पथकापासून काही अंतर पुढे जात आपले वाहन उभे केले व तेथून तो पायी चालत पोलिसांपर्यंत आला. यावेळी पथकाने कोठून आला, कोठे चालला, वाहनात काय आहे, सोबत कोण आहे अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरु करताच त्याने उडवाउडवी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या वाहनाची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील बाजूचे आसन काढून मोकळ्या केलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात मांस भरल्याचे आढळून आले. यानंतर दोघांनाही ताब्यात घेत वाहनासह घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

याप्रकरणी कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फिरोज सिकंदर शेख (वय 37) व आयाज पापामिया मोमीन (वय 32, दोघेही रा.आळकुटे, ता.पारनेर) यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 325, 271, 3 (5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या ताब्यातून एक लाख चाळीस हजार रुपये मूल्य असलेल्या तब्बल सातशे किलो गोवंशाच्या मांसासह चार लाखांची कार असा एकूण पाच लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोमांसाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली आहे.

दहा वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गोहत्येच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढवून ती गोवंश करण्यात आली. मात्र हा कायदा अस्तित्वात येवून दशकभराचा कालावधी उलटूनही पोलिसांना या बेकायदा व्यवसायावर पूर्णतः नियंत्रण मिळवता आलेले नाही. अर्थात आपल्याकडे कायदेशीर व्यवसायांपेक्षा कोणताही बेकायदा व्यवसाय अधिक जोमाने चालतो असे बोलले जात असल्याने या व्यवसायात असलेल्यांनी पोलिसांना हाताशी धरुन आपला उद्योग केवळ सुरुच न ठेवता त्याचा विस्तारही केला. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने गेल्या दहा वर्षात संगमनेरात येवून गेलेले बहुतांश अधिकारी गायींच्या रक्ताने मालामाल झाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरात परिवर्तन होवून शिवसेनेचा आमदार निवडून आल्याने आतातरी संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने बंद होतील असा कयास होता. मात्र या व्यवसायातून होणार्या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे सत्ता बदल होवून सहा महिने उलटत असतानाही कोणताच फरक पडला नव्हता. त्या विरोधात स्थानिक पातळीवर वारंवार कारवाईच्या मागण्याही झाल्या, मात्र पोलिसांवर त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. प्रत्येकवेळी शहर पोलिसांकडून कत्तलखाने बंद असल्याचे चित्र दाखवले जात होते, मात्र सोमवारी (ता.28) आमदार अमोल खताळ यांनी पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, देवीदास ढुमणे व विलास पुजारी यांची बैठक घेत अवैध धंदे आणि कत्तलखान्यांवरुन त्यांची कानउघडणी केली. त्यानंतर अचानक ‘अॅक्शन’मध्ये आलेल्या घारगाव पोलिसांनी आपली पाठ थोपटवून घेण्याच्या नादात शहर पोलिसांचीच लक्तरं उधडली.

