आई-वडिलांना सांभाळणार्‍या मुलांनाच मिळणार वारसाचा लाभ नवलेवाडी ग्रामस्थांनी घेतला ग्रामसभेत एकमताने क्रांतिकारी निर्णय


नायक वृत्तसेवा, अकोले
आपल्या आई-वडिलांना जी मुले सांभाळतात त्यांनाच पित्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील असा महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी ठराव अकोलेजवळील नवलेवाडी ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत टाळ्यांच्या गजरात एकमताने संमत केला. या क्रांतिकारी ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अन्य ग्रामपंचायतींपुढे नवलेवाडी गावाने आदर्श निर्माण केला आहे, असा धाडसी निर्णय घेणारी महाराष्ट्रात बहुदा ही पहिलीच ग्रामपंचायत असावी.

नवलेवाडीचे सरपंच प्रा. विकास नवले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा उत्साही वातावरणात पार पडली. या सभेतील हा महत्त्वाचा ठराव राज्य शासनाच्या महसूल विभाग व ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना पाठवून ग्रामसभेत संमत झालेल्या ठरावानुसार महसूल विभागाला वारस ठरविताना ग्रामपंचायतीकडून संमती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करता येतील. शासकीय सुविधा अगर विविध योजनांचा लाभ आई-वडिलांना मिळेलच. पण जी मुले आई-वडिलांना सांभाळत नसतील त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

जर लाभ दिला तर आई-वडिलांची सर्वस्वी जबाबदारी शासनाकडे राहील असा ठराव ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी मांडला. त्यास अ‍ॅड. आनंद नवले यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्वच नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावास आपला पाठिंबा दर्शविला. यापूर्वी सैन्य दलातील विविध जवानांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णयही नवलेवाडी ग्रामपंचायतने घेतलेला आहे.

सामाजिक पातळीवर मानवी जीवनाला काळीमा फासणार्‍या व कौटुंबिक जीवनात आई-वडिलांना न सांभाळता त्यांचीच वारस मुले-मुली आपल्या स्वतःच्या जीवनात मश्गुल असतात. विशेष म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग ते घेत असतात. पण आई-वडिलांना मात्र घरातून काढून देऊन म्हातारपणी त्यांच्या पालनपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून आजारपणामध्येही आर्थिक जबाबदारी न घेता त्यांच्याशी आपलं जणू काही नातंच नाही अशाप्रकारे बाजूला ठेवून त्यांचे वारस आज सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपभोगतात. परिणामी म्हातारपण हा शाप ठरला असून म्हातारपणातील वयात आई-वडिलांना जगणे मुश्किल झाले असल्याने ग्रामसभेत हा महत्वपूर्ण ठराव एकमताने संमत करण्यात आला. या ग्रामसभेस आरोग्य कर्मचारी, कृषी अधिकारी, वीज अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

Visits: 161 Today: 1 Total: 1423091

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *