मयत जवानाच्या पत्नीवर वारंवार अत्याचार करुन लाखोंची फसवणूक! बाप-लेकाचे संतापजनक कृत्य; शिक्षकीपेशाला कलंक असलेला नराधम अटकेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून सुरु असलेल्या प्रत्यूत्तराच्या तयारीने नागरिकांच्या राष्ट्रभावना उचंबळून आलेल्या असतानाच आता तालुक्यातून अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत भारतीय लष्करात सेवेत असलेल्या मात्र दहा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या संगमनेर तालुक्यातील जवानाच्या विधवा पत्नीला लग्नाचे आमीष दाखवून पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नराधम शिक्षकाने वारंवार शारीरिक अत्याचार केले. या प्रसंगाचे छायाचित्रण करुन त्याआधारे पीडितेला पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या 31 लाख 17 हजार 416 रुपयांची लबाडीने फसवणूक केली. या दूष्कृत्यात त्याच्या बापानेही त्याला पूर्ण साथ दिली. दोन वर्ष चाललेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने नोकरी सोडून पठारभागातील माहेरी वास्तव्य केल्यानंतर ‘त्या’ नराधमाच्या कृत्यांना गेली पाच वर्ष ब्रेक लागला होता. मात्र अलिकडच्या काळात त्याने पुन्हा पीडितेला वारंवार फोन करुन लॉजवर येण्याची धमकी देण्यास सुरुवात केल्याने अखेर वैतागलेल्या पीडितेने आळेफाटा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी नराधम शिक्षक गणेश लहानु काकड याला बेड्या ठोकल्या असून त्याचा बाप मात्र अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. या घटनेने पठारभागासह संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षी या नराधम शिक्षकावर त्याच्याच वर्गातील इयत्ता नववीच्या विद्यार्थीनीचा सतत पाठलाग, अश्लिल शेरेबाजी आणि विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सोनुसार कारवाई झाली होती.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार 2017 ते 2020 या कालावधीत आळेफाटा परिसरात घडला आहे. शहराच्या उत्तरेकडील एका गावातील भारतीय लष्करात जवान असलेल्या तरुणाचा पठारभागातील एका गावातील तरुणीशी 2013 मध्ये विवाह झाला होता. त्याच्यापासून पीडितेला एक मुलगीही झाली. 2003 पासून सैन्यदलात सेवेत असलेला हा जवान 26 सप्टेंबर 2015 रोजी कर्तव्यावर जात असताना त्याच्या वाहनाचा अपघात होवून दुर्दैवाने त्यात त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील पीडिता मुलीला घेवून पठारभागातील आपल्या माहेरी आई-वडिलांसोबत राहत होती.

पतीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी पीडितेने आळेफाटा येथे नोकरी मिळवली व दररोज ती पठारावरुन तेथे ये-जा करुन आपला व मुलीचा खर्च भागवू लागली. दरम्यानच्या काळात 2019 पर्यंत भारतीय सैन्यदलाकडून मयत जवानाच्या कुटुंबाला मिळाणार्या आर्थिक लाभाचे पैसेही टप्प्याटप्प्याने पीडितेच्या बँक खात्यात जमा होत होते. 17 डिसेंबर 2017 रोजी पीडित 29 वर्षीय महिला आळेफाटा येथून आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाली असता आरोपी गणेश लहानु काकड (रा.बोटा, ता.संगमनेर) दुचाकीवरुन तेथे आला जणू तो पीडितेच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखत असल्याचा आभास निर्माण करीत त्याने आपण तुमच्या गावाकडेच निघालो असल्याचे सांगून पीडितेला आपल्या दुचाकीवर बसवले.

त्याच्यावर भरवसा ठेवून दुचाकीवर बसलेल्या पीडितेला मात्र त्याची ओळख पटत नसल्याने तिने प्रवासादरम्यान आपली ओळख कशी निर्माण झाली अशी विचारणा केल्यानंतर त्याने पीडितेने पठारावरील एका बँकेत 12 लाख रुपयांची सुरक्षाठेव पावती करताना पाहिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आरोपी काकड जवळजवळ रोजच पीडितेच्या जाण्याच्यावेळी आळेफाटा स्थानकावर पोहोचत आणि तिला आपल्या दुचाकीवरुन गावाकडे घेवून जात. त्यातून एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर झाल्याने त्याने पीडितेला वारंवार फोन करुन जवळीकही वाढवण्यास सुरुवात केली. त्यातून त्याने पीडितेची कौंटुबिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेत तिच्या बँक खात्यात लाखों रुपये असल्याची माहिती मिळवली.

दररोजच्या प्रवासातून पीडितेचा विश्वास संपादन करीत त्याने आपण अविवाहित असल्याचे व मुलीचा सांभाळ करण्यास तयार असल्याचे सांगत पीडितेला लग्नाचे आमीष दाखवण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये त्याने अशाच भूलथापा मारीत पीडितेला आळेफाटा परिसरातील एका लॉजवर नेले व अत्याचाराचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी लग्नानंतरच असे काही करा असे म्हणतं पीडितेने त्याला विरोध केल्यानंतर त्याने पुन्हा लग्न करणारच आहोत, माझा शब्द आहे असे म्हणत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचे मोबाईलमधून छायाचित्रणही केले. त्यानंतर त्याने या छायाचित्रणाचा आधार घेवून 2018 ते 2020 या कालावधीत पीडितेला आळेफाटा, ओझर, तळेगांव ब्रीज अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या विविध लॉजमध्ये वारंवार नेवून शारीरिक अत्याचार केले.

या दरम्यान त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेच्या ऑनलाईनचा पासवर्ड, एटीएम कार्ड व त्याचा पीन क्रमांक आदी तिच्याकडून काढून घेत लष्करी जवान असलेल्या पतीच्या निधनानंतर तिच्या उपजिवीकेसाठी मिळालेली 31 लाख 17 हजार 416 रुपयांची संपूर्ण रक्कम काढून घेतली. या संपूर्ण घटनाक्रमात नराधम शिक्षकाचा बाप लहानु काकड यानेही पीडितेला त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन बदनामीची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बँकेतील संपूर्ण रक्कम फस्त झाल्यानंतर 2020 पासून आरोपी व पीडितेचा कोणताही संपर्क झाला नव्हता. मात्र गेल्या 8 एप्रिलरोजी आरोपी गणेश काकड याने पुन्हा पीडितेला फोन करुन आळेफाटा येथील लॉजवर येण्यास सांगीतले व तसे न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्याच्या वारंवारच्या या अत्याचाराला वैतागलेल्या पीडितेने अखेर तिच्याबरोबर घडलेला संपूर्ण प्रसंग आपल्या जन्मदात्यांना सांगितला. हा प्रकार ऐकून पायाखालची जमीन सरकलेल्या त्या माता-पित्यांनी आपल्या लेकीला धीर देत आळेफाटा पोलीस ठाणे गाठले व पोलीस उपनिरीक्षक विनोद धृवे यांना घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी शिक्षक असलेल्या नराधम गणेश लहानु काकड व त्याचा बाप लहानु काकड या दोघांवर वारंवार अत्याचार, लैंगिक छळवणूक व बलाद्ग्रहण केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64 (2) (म), 75 (1) (दोन) (तीन), 308 (1), (2) प्रमाणे गुन्हा दाखल करुन मुख्यआरोपी नराधम शिक्षक गणेश लहानु काकड (रा.बोटा) याला कारागृहात टाकले असून त्याचा बाप मात्र धोतर धरुन पळाला आहे.

एकीकडे पहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आवेशात प्रत्यूत्तराची तयारी करीत असल्याने देशात राष्ट्रभक्तीचे वारे वाहत असताना दुसरीकडे नराधम शिक्षकाने जवानाच्या विधवा पत्नीच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यासह तिच्या व तिच्या मुलीच्या भविष्यासाठी शासनाकडून मिळालेल्या संपूर्ण रकमेवर डाका घातल्याने पठारभागासह संपूर्ण संगमनेर तालुक्यात संताप निर्माण झाला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याचीही मागणी होत आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारावरील बोटा गावचा रहिवासी असलेला हा नराधम शिक्षक पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत कार्यरत आहे. अतिशय विकृत मानसिकता असलेल्या या नराधमाने शिष्यरुपी अवघ्या इयत्ता नववीच्या आपल्याच वर्गातील विद्यार्थीनीवर डोळा ठेवून महिनाभर शाळेपासून तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. वारंवार तिच्याशी जवळीक साधून अश्लिल शेरेबाजी केली. प्राचार्यांकडे तक्रार करुनही त्यांनी उलट पीडितेलाच दुषणं दिली. ऑगस्ट 2024 मध्ये तर या नाराधमाने तिचा पाठलाग करीत थेट हात धरुन तिचा विनयभंग करण्यापर्यंत मजल मारली. त्याच्या या दूष्कृत्याची माहिती घाबरलेल्या मुलीने आईला सांगितल्यानंतर हडपसर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेसह पोक्सोनुसार कारवाई करीत त्याला कारागृहातही टाकले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम या विकृतावर झाला नसल्याचे या घटनेतून दिसत असल्याने आणि आतातर त्याचा बापही या कृत्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने शिक्षा होईस्तोवर या नराधमाचा जामीन मंजूर होवू नये अशी मागणी जोर धरीत आहे.

