संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवातील ‘कथीत’ वाद विकोपाला! दुसर्‍या गटाकडूनही विरोधी फिर्याद; लोकप्रतिनिधींनी समन्वय घडवण्याची अपेक्षा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेकडों वर्षांपासून निघणार्‍या आणि महिलांच्या असामान्य पराक्रमाने इतिहासात नोंद झालेल्या संगमनेरच्या ग्रामोत्सवाला आता वेगळे वळण लागले आहे. पूर्वीच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर वाद्य वाजवण्याच्या किरकोळ कारणावरुन आयोजक समितीशी दुसर्‍या गटाचे वादंग झाल्यानंतर जन्मोत्सव समितीच्या वतीने दहाजणांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी दुसर्‍या गटाची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे आरोप झाल्यानंतर आता ललित शिंपी या तरुणाच्या फिर्यादीवरुन तब्बल 15 दिवसांनंतर आयोजन समितीच्या पदाधिकार्‍यांसह दहाजणांविरोधातही गंभीर कलमान्वये तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे संगमनेरचा ऐतिहासिक हनुमान रथोत्सव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


याबाबत रविवारी (ता.27) शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.11) तक्रारदार ललित शरद शिंपी हा त्याचा मित्र ललित परदेशी याच्या सोबत चंद्रशेखर चौकात होणारी वाद्यांची सलामी पाहण्यासाठी गेले होते. त्यांना पाहताच कमलाकर भालेकर, योगीराज परदेशी, चेतन तारे, अक्षय थोरात व हर्ष जोशी हे पाचजण त्यांच्याजवळ आले. यावेळी भालेकर यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत ‘तु इथे का आलास?, आम्ही चंद्रशेखर चौकाचे बाप आहोत, तु इथून निघून जा!, नाहीतर तुला पाहून घेईल’ अशी धमकी दिली. त्यातून वाद निर्माण होवू नये म्हणून फिर्यादी आपल्या मित्रासह तेथून निघून गेला.


त्यानंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी (ता.12) सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी शिंपी त्याचे मित्र गणेश भांगे, नितीन जाधव व अक्षय दाणी मारुतीच्या दर्शनासह रथोत्सवात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर चौकात आले. त्यावेळी योगीराज परदेशी याने त्यांच्याजवळ जात; ‘तुम्हाला काल रात्रीच इथे येवू नका म्हणून सांगितले तरीही तुम्ही कशाला आलात?’ असा सवाल करीत शिवीगाळ केली. फिर्यादी व त्याचे मित्र समजावून सांगत असताना कमलाकर भालेकर, योगीराज परदेशी, चेतन तारे, अक्षय थोरात, हर्ष जोशी, श्यामसुंदर जोशी, गिरीश मेंद्रे, श्रीराम गणपुले, भगवान गिते व शुभम लहामगे यांनी त्या सर्वांना शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. तेव्हा फिर्यादी शिंपी याने ‘आम्ही दरवर्षी मारुतीच्या दर्शनाला येतो, आम्हाला फक्त दर्शन घ्यायचे आहे..’ असे सांगताच त्या सर्वांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.


या गदारोळात फिर्यादीच्या गळ्यातील एकतोळे वजनाची सोन्याची साखळीही ओढून घेण्यात आली. एकाचवेळी आठ-दहाजण मारहाण करीत असल्याने आम्हाला त्यांच्या तावडीतून सुटणे अथवा त्यांना विरोध करणे शक्य झाले नाही असेही तक्रारदाराने दाखल फिर्यादीत म्हटले आहे. हा गदारोळ सुरु असताना तेथे भाविकांचीही गर्दी जमल्याने त्यांनी आम्हा सर्वांना त्यांच्या तावडीतून सोडवल्याचे व त्या उपरांतही त्यांनी ‘विरोधात तक्रारी दाखल करीत बसलात तर, तुमची घरंही जाळून टाकण्याची धमकी दिल्याचे’ तक्रारदाराने म्हंटले आहे. त्यावरुन पोलिसांनी उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विश्‍वनाथ भालेकर यांच्यासह योगीराज कुंदनसिंग परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात, हर्ष श्यामसुंदर जोशी, श्यामसुंदर रामेश्‍वर जोशी, गिरीश राजेंद्र मेंद्रे, श्रीराम अरविंद गणपुले, भगवान तुकाराम गिते व शुभम चंद्रकांत लहामगे अशा दहाजणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 119 (1), 189 (2), 191 (2), 115 (2), 352, 351 (2), 190 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


यापूर्वी 15 एप्रिलरोजी श्रीराम व हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी विनायक गरुडकर, सौरभ उमर्जी, शेखर सोसे, अमोल क्षीरसागर, श्याम नालकर, सोनु नालकर, शुभम परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू व राहुल नेहुलकर याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरोधात ऐतिहासिक रथोत्सव रोखल्याचा आरोप करीत दोन दिवस घडलेला कथीत घटनाक्रम मांडल्यावरुन या सर्वांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 119 (1), 189 (2), 191 (2) (3), 118 (1), 115, 125 (ए), 126 (2), 351 (2), 61 (2), 300 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर दुसर्‍या गटानेही तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला त्यावेळी दाद दिली नसल्याचा आरोप आहे. हनुमान जयंतीच्या दिनी घडलेल्या या प्रकाराने संगमनेरच्या सामाजिक वातावरणात गोंधळ निर्माण होवून ग्रामोत्सव म्हणून मान्यता असलेल्या या रथोत्सवात घडलेल्या किरकोळ कारणावरुन इतका गंभीर गुन्हा दाखल झाल्याने शहरातून नाराजी व्यक्त होत होती. काहींनी त्या विरोधात आंदोलनाचाही इशारा दिला होता.


संगमनेरच्या हनुमान जयंती रथोत्सवाला शेकडों वर्षांची परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पूर्वी मर्यादीत असलेल्या शहरातील नागरिक हा उत्सव एकत्रितपणे साजरा करीत असल्याने त्याला ग्रामोत्सव म्हणून मान्यता मिळाली. कालांतराने शहराच्या विस्तारासह लोकसंख्येतही भर पडत गेल्याने मंदिर आणि वर्षभरातील उत्सवांच्या व्यवस्थापनासाठी विश्‍वस्त मंडळाची स्थापना होवून गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या मार्फतच हा उत्सव साजरा केला जातो. गेल्याकाही वर्षांपासून या उत्सवात शिवजयंती उत्सव समितीनेही सहभाग घेत एका वाद्य पथकाची भर घातली. मात्र अलिकडच्या काळात शिवजयंती उत्सव समितीमधील काहींशी चंद्रशेखर चौकातील काहींसोबत व्यक्तिगत वाद निर्माण होवून आजच्या स्थितीत ते टोकावर गेले आहेत.


त्यातच गेल्याकाही वर्षात राज्यातील राजकारणातही आमुलाग्र बदल झाल्याने त्याचेही पडसाद या उत्सवाच्या माध्यमातून उमटू लागल्याने जन्मोत्सव समिती आणि शिवजयंती उत्सव समितीमधील दुरावा वाढत गेला. त्यातूनच हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी या दोन्ही समित्यांच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक खडाजंगी होवून त्याचे पर्यवसान थेट गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात झाले. गुन्हा दाखल झालेली दोन्ही बाजूची मंडळी समाजात प्रतिष्ठा असलेली आहे. त्यामुळे हा प्रकार संगमनेरकरांना अस्वस्थ करणारा ठरला असून शहराच्या ग्रामोत्सवाला अशाप्रकारच्या वादाचे गालबोट लागू नये म्हणून दोघांनीही एक-एक पाऊल मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


शेकडों वर्षांची परंपरा असलेल्या संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवाला 95 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे दरवर्षी राज्यातील सर्व आघाडीची माध्यमं पोलिसांकडून वाजतगाजत येणारा भगवाध्वज आणि महिलांकडून ब्रह्मचारी मारुतीयाचा रथ ओढला जाण्याचा क्षण टीपण्यासाठी गर्दी करतात. अशावेळी या उत्सवात पूर्ववैमनस्य ठेवून घडलेला प्रकार अयोग्य आहे. आता या प्रकरणात दोन्ही बाजूने गंभीर कलमान्वये परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने एकंदरीतच या प्रकरणाचे गांभीर्य खूप वाढले आहे. त्यातून संगमनेरच्या या ऐतिहासिक उत्सवाच्या इतिहासात चुकीची नोंद होण्याचीही शक्यता आहे. यासर्व गोष्टींचा विचार करुन संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी दोन्ही बाजूची समजूत काढून दाखल केलेल्या तक्रारी माघारी घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा महिलांच्या पराक्रमाचा इतिहास असलेल्या पानांना डाग लागण्याची शक्यता आहे.

Visits: 60 Today: 3 Total: 511549

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *