शनिवार व रविवारी अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद! तिसऱ्या श्रेणीतील नियमानुसार राज्यातील एकतीस जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस कठोर निर्बंध..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सोमवारपासून राज्यातील एकतीस जिल्ह्यांसह अहमदनगर जिल्ह्यातही कोविड प्रादुर्भावाच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात आलेल्या तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सर्व व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्याची तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक वगळता उर्वरित सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या श्रेणीतील निर्बंध लागू झाल्यापासून उद्याचा पहिला शनिवार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम आहे. उद्या केवळ अत्यावश्यक श्रेणीत मोडणारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे अशी माहिती संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
एप्रिल व मे महिन्यात संपूर्ण राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातही कोविड संक्रमणाने अक्षरशः थैमान घातले होते. या दोन महिन्याच्या काळात जिल्ह्यातून जवळपास दीड लाखाहून अधिक रुग्ण समोर आले. तर हजारो नागरिकांना आपले जीव गमवावे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग झपाट्याने वाढत गेल्याने सुरुवातीच्या काळात सर्वाधिक संक्रमण असलेल्या देशातील दहा जिल्ह्यांमध्ये अहमदनगरचा समावेश झाला होता. मात्र जूनच्या पहिल्या तारखेपासून जिल्ह्यातील संक्रमणाला ओहोटी लागून महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील संक्रमणाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. असे असले तरीही राज्यात नव्याने दाखल झालेला डेल्टा श्रेणीतील डेल्टा प्लस या विषाणूमुळे तिसरी लाट आताच्या संक्रमणापेक्षा अधिक भयानक असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरल्याचे चित्र दिसत असले तरीही कोविडचे भय कायम आहे. त्यामुळेच राज्य शासनाने चाळीस टक्क्यांहून कमी ऑक्सिजन खाटांवर रुग्ण असलेल्या व दहा टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध लागू केले आहेत.
त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार या कालावधीत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आठवड्याचे शेवटचे दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील सेवा वगळता उर्वरित सर्व व्यवहार बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वैद्यकीय सेवा आणि त्यासंबंधी इतर सेवा, किराणा मालाची दुकाने, दूध, फळे, पालेभाज्या, मटन, चिकन, अंडी यांची दुकाने. बेकरी उत्पादने, ग्लोसरीज्, खाद्यपदार्थांच्या संदर्भातील सर्व दुकाने व रेस्टॉरंट (फक्त पार्सल सेवा) या शिवाय कृषी विषयक सेवा देणारी सर्व ठिकाणे आदींना सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. उद्या शनिवारी पहिल्यांदा जिल्ह्यातील नागरिकांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
Visits: 25 Today: 2 Total: 118357