पोलीस कोठडीतील अमोल कर्पेचा कारागृहातील कैद्यांकडूनच ‘रिमांड’! विद्यार्थीनीवरील अत्याचार प्रकरण; मध्यरात्री लाथाबुक्क्यांनी झाली बेदम मारहाण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रुग्णालयात दाखल असलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थीनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याच्या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त होत असतानाच आता त्याचे पडसाद संगमनेरच्या कारागृहातही उमटले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर आरोपी डॉ.अमोल संताजी कर्पे याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रात्री वैद्यकीय तपासणी करुन त्याला कोठडीत टाकण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात नव्याने कोठडीत आलेल्या आरोपी डॉक्टरचे कारनामे आधीपासूनच कैद असलेल्या अन्य आरोपींना समजल्यानंतर त्यांचाही पारा चढला आणि त्यातील काहींनी काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा ‘रिमांड’ घेत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बराचवेळ चाललेल्या या प्रकारानंतर कारागृह बंदोबस्तावरील पोलिसांनी कोठडीच्या दिशेने धाव घेतल्याने डॉ.अमोल कर्पे याला सुरु असलेली मारहाण थांबली. मात्र या प्रकाराने सदरचा आरोपी प्रचंड घाबरला असून त्याला आपल्या दूष्कृत्याचा आता पश्चाताप होवू लागला आहे.
रविवारी (ता.6) अवघा देश श्रीरामाच्या जन्म सोहळ्याची तयारी करीत असतानाच संगमनेरात मात्र मानवी जगात देवदूताचा दर्जा असलेल्या डॉक्टरच्या वेशातील अमोल कर्पे या नराधमाने वैद्यकीय पेशालाच कलंकित करण्याचा प्रकार केला. पैशांच्या जोरावर यापूर्वीही अशाकाही प्रकरणात चर्चेत आलेल्या या नराधमाने त्याच्या मुलीच्या वयात असलेल्या अवघ्या सोळा वर्षीय विद्यार्थीनीला दमबाजी आणि धमक्या देत स्वतःच्याच रुग्णालयाच्या छतावर नेवून भल्या पहाटे चार वाजता त्याच्या मनातील वासना शमवली. यावेळी त्याने डॉक्टर म्हणून असलेल्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सदरचा प्रकार कोणास सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकीही भरली. घटनेपूर्वीच्या दोन दिवस उपचारादरम्यान ‘डॉक्टर काका’ म्हणून ज्याला मनात आदराचे स्थान दिले त्याच्याकडूनच घडलेल्या या भयंकर प्रकाराने ती कोवळ्या वयातील विद्यार्थीनी हादरली.
सदरचा प्रकार सायंकाळ होताहोता संपूर्ण जिल्ह्यात समजल्याने ऐन श्रीरामनवमीच्या दिनी सर्वत्र संताप उसळू लागला. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून सदरचा प्रकार समोर आल्यापासूनच आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. या महाशयांनी यापूर्वीही अशाप्रकारचे उद्योग केल्याचे व घटनेनंतर पैशांच्या बळावर परस्पर तडजोड केल्याच्या चर्चा पीडितेच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी ऐकल्या असल्याने त्यांनी सकाळपासूनच आरोपीला अटक करण्याची मागणी सुरु केली होती. त्यामुळे दबाव निर्माण झालेल्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत दडून बसल्याचा निष्कर्ष काढला. याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांना त्याची माहिती देत त्याला तत्काळ ताब्यात घेण्याची विनंतीही करण्यात आली. त्यानुसार नाशिक पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावताना आरोपी डॉ.अमोल कर्पे याच्या लागलीच मुसक्या आवळल्या. सायंकाळी नाशिकमध्ये पोहोचलेल्या शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून संगमनेरला आणले.
आरोपीने रविवारची रात्र अन्य कोठडीत काढल्यानंतर सोमवारी (ता.7) सकाळपासूनच आक्रमक झालेल्या पीडितेच्या नातेवाईकांना हुलकावणी देत दुपारी उशिराने तगड्या पोलीस बंदोबस्तात त्याला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश योगेश मनाठकर यांच्यासमोर उभे करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करताना परिणामांची पूर्ण कल्पना असतानाही सदरचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आणून देताना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने त्याची दहा दिवसांच्या कोठडीत रवानगी केली. सायंकाळी उशिराने त्याची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला सुमारे 20 कैदी असलेल्या बराक क्रमांक तीनमध्ये टाकले. त्यावेळी कारागृहातील कैद्यांकडून नियमित होणार्या आरत्यांचा कार्यक्रम सुरु होता. रात्रीच्या सुकडी वाटपानंतर सर्वकाही शांत झाले असतानाच बराक क्रमांक तीनमध्ये मात्र वेगळीच हालचाल सुरु होती.
या बराकीत आधीपासूनच कैद असलेल्या खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धाडसी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील काही आरोपींनी नव्याने कोठडीत दाखल झालेल्या डॉ.अमोल कर्पे याची झाडाझडती घेत सुरुवातीला त्याला बराकीची स्वच्छता करण्यास भाग पाडले. त्यानंतर काहींनी रुग्ण म्हणून दाखल झालेल्या आणि तुझ्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करताना लाज कशी वाटली नाही? अशा शब्दात सुनावत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान कैद्यांनी त्याला निर्वस्त्र केल्याचीही चर्चा आहे, मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास अर्धातास सुरु असलेल्या या प्रकारात बराकीतील काही कैद्यांनी डॉ.अमोल कर्पे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्याने केलेल्या कृत्याचा ‘रिमांड’ घेतला. त्याच्या विव्हळण्याच्या आवाजाने कारागृहाकडे धावलेल्या सुरक्षा रक्षकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करीत डॉ.कर्पे याला सुरु असलेली मारहाण थांबवल्याचे वृत्त आहे.
वैद्यकीय पेशालाच कलंकित करणार्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप निर्माण झालेला असतानाच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दीर्घकाळापासून संगमनेरच्या उपकारागृहात कैद असलेल्या आरोपींचे मनंही सून्न झाले आहे. त्याचा राग व्यक्त करताना त्यांनी कोठडीत दाखल झालेल्या डॉ.अमोल कर्पे याला मारहाण केली. मात्र कारागृहाच्या बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सदरचा प्रकार थांबवला. यावरुन सदरची घटना सामान्यांसह कारागृहातील कैद्यांनाही धक्का देणारी ठरल्याचे दिसून येते.
संगमनेरच्या उपकारागृहात चार बराकी असून त्यातील एक महिलांसाठी राखीव आहे. उर्वरीत तीन बराकींची क्षमता प्रत्येकी 12 आरोपींची असतानाही त्यात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि न्यायालयीन कोठडीतील आरोपींना कोंबण्यात आले आहे. त्यातीलच बराक क्रमांक तीनमध्ये पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपी डॉ.अमोल कर्पे याला ठेवण्यात आले आहे. सामान्यपणे पोलिसांना कोठडीतील आरोपीची चौकशी करायची असल्यास त्याला पोलीस निरीक्षकांच्या कक्षात अथवा ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कोठडीत घेवून जातात व चौकशीनंतर पुन्हा कारागृहात टाकले जाते. सोमवारी पोलिसांनी डॉ.कर्पे यांची चौकशी केल्याची माहिती नाही, मात्र बराकीतील कैद्यांनी त्याची चांगलीच चौकशी केली असून त्याचा ‘रिमांड’ही घेतला आहे.