जिल्ह्यातील 161 प्राथमिक शाळांवर बंदची टांगती तलवार सर्वाधिक चाळीस शाळा अकोलेत; बंद न करण्याचे शिक्षक भारतीची मागणी
नायक वृत्तसेवा, नगर
एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी मराठी माध्यमाकडे वळत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 161 शाळांत 10 पेक्षाही कमी विद्यार्थीसंख्या आहे. या शाळांवर बंदची टांगती तलवार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 564 शाळा आहेत. यातील 161 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी पट आहे. 612 शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. जिल्ह्यात 1 ते 10 पटसंख्या असणार्या सर्वाधिक 40 शाळा अकोले तालुक्यात आहेत. 20 शाळा पाथर्डीत, 20 संगमनेरात, 12 शेवगावमध्ये तर 13 श्रीगोंदा तालुक्यात आहेत. या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे.
राज्यातील तब्बल 15 हजार जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी झाल्याचे मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थी शेजारच्या शाळेत वर्ग करण्याचे, तसेच शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन करण्याच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी शासनाने माहिती मागवली होती. मात्र, त्यास विरोध झाल्याने तूर्तास शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केलेल्या नाहीत, असे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले.
सदर निवेदनावर सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, रूपाली कुरूमकर आदिंची नावे आहेत.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन…
शाळा बंद करू नये यासाठी शिक्षक भारतीच्यावतीने शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले. शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गाडगे व जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर यांनी दिला आहे.