दोनशे साखर सम्राट पांढर्‍या कपड्यातील दरोडेखोर ः शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टाकळीमियाँ येथे ऊस परिषद


नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यातील दोनशे साखर कारखान्यांनी काटा मारीत 1 कोटी 32 लाख टन ऊसावर डल्ला मारुन 4 हजार 600 कोटींचा दरोडा घातला. साखर उतारा, मोलॅसेस, इथेनॉलमध्ये चोर्‍या करून, ऊस दरात फटका देणारे दोनशे साखर सम्राट पांढर्‍या कपड्यातील दरोडेखोर आहेत. त्यांना साडेतीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी वठणीवर आणतील, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे ऊस परिषदेमध्ये शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रावसाहेब करपे होते. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अनंत निकम, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सुनील लोंढे, बाळासाहेब जाधव, अमृत धुमाळ, श्यामराव निमसे, उपसरपंच किशोर मोरे, सुभाष करपे, दत्तात्रय आढाव, संतोष चोळके, जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, साखर उतारा चोरून, बिनशिक्क्याच्या साखर पोत्यांची मध्यरात्री कारखान्यातून वाहतूक होते. कोल्हापूर जिल्ह्यात 2900 ते 3300 पर्यंत ऊस दर मिळतो. अहमदनगर जिल्ह्यात 2100 ते 2400 एवढा कमी ऊसदर मिळतो. महागाईचा आगडोंब उसळला. परंतु, दहा वर्षांपूर्वीचा ऊसदर आजही तोच आहे. व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. तरच योग्य ऊसदर मिळेल. राजकीय विरोधक विखे-थोरात यांचे ऊसदर कमी देण्यावर एकमत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Visits: 209 Today: 1 Total: 2121153

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *