कोविडने संगमनेर तालुक्यातील तेविसावा बळी घेतला! कुंभारआळा परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यु

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरकरांना दररोज नवनवीन धक्के देणार्‍या कोविडच्या विषाणूंनी या महिन्यातील तिसरा तर आत्तापर्यंतचा तेविसावा बळी नोंदविला आहे. दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने आधीच दहशतीखाली आलेल्या संगमनेरकरांना एकामागून एक कोविडच्या बळींचाही धक्का बसत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात कर्‍हे येथील 55 वर्षीय इसमाच्या रुपाने 22 वा बळी गेला होता, त्यानंतर अवघ्या आठच दिवसांत त्यात आता संगमनेर शहरातील एका बाधिताच्या मृत्युची भर पडली आहे. या वृत्ताने संगमनेर शहरातील व्यापारी क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


दोनच दिवसांपूर्वी कुंभारआळा परिसरात राहणार्‍या व संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या एका 78 वर्षीय इसमाला कोविडची बाधा झाल्याचा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यांच्यावर शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या दरम्यानच आज सकाळी त्यांची श्‍वसनक्रीया बंद पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. कालच त्यांच्या कुटुंबातील बारा वर्षीय मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता, हा धक्का सहन करीत असतांनाच आज सदर इसमाचा मृत्यु झाल्याने कुंभारआळा परिसरासह बाजारपेठ व संगमनेरच्या व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


सदर मृत्यु पावलेल्या इसमाचा गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरच्या प्राचीन बाजारपेठेत व्यवसाय आहे. त्यासोबतच संगमनेरातील जून्या वाहनांचे पहिले विक्रेते म्हणूनही त्यांची संपूर्ण शहराला वेगळी ओळख होती. बाजारपेठेतील जबरेश्‍वर मंदिराच्या व्यवस्थापनात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहीला आहे. दरवर्षी या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला होणार्‍या महाप्रसादाच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरत होता. त्यांना कोविडची लागण झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता, त्यातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांच्या दुर्दैवी मृत्युची वार्ता समोर आल्याने संगमनेरातून हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या 30 मार्चरोजी संगमनेर शहरातील नायकवाडपूरा भागासह तालुक्यातील आश्‍वी बु. येथून पहिल्यांदा रुग्ण समोर आले होते. त्यानंतर तब्बल महिन्याभराने 7 मे रोजी धांदरफळमधील 68 वर्षीय इसमाच्या रुपाने कोविडने तालुक्यातील पहिला बळी घेतला होता. त्यानंतर त्याच महिन्यात अन्य चार जणांसह पाच जणांचा मृत्यु झाला. जूनमध्येही कोविडने सहा जणांचा तर जुलैमध्ये आठ जणांचा बळी घेतला. या महिन्यात 4 ऑगस्टरोजी निमोण येथील 75 वर्षीय इसम, 6 ऑगस्टरोजी मालदाडरोड येथील 81 वर्षीय इसम, 9 ऑगस्टरोजी कर्‍हे येथील 55 वर्षीय इसम व आज संगमनेर शहरातील कुंभारआळा परिसरातील 78 वर्षीय इसमाचा बळी गेल्याने संगमनेरात पुन्हा एकदा कोविडची दहशत निर्माण झाली आहे.

Visits: 77 Today: 1 Total: 1114183

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *