घ्या आता! पालिकेच्या कचराडेपोलाही भीषण आग! संगमनेर खुर्दच्या आसमंतात आगीचे लोळ; भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळापासून संगमनेर शहरातून निघणारा घनकचरा आपल्या उदरात घेणार्या संगमनेर खुर्दच्या कचराडेपोला भीषण आग लागली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीने क्षणात रौद्ररुप धारण करीत आपला आवाका वाढवल्याने संगमनेर खुर्दच्या आसमंतात आगीचे प्रचंड लोळ उठले आहेत. पालिकेच्या दोन बंबांसह या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या प्रकाराने भयभीत झालेल्या संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी आपल्या जून्या मागणीला पुन्हा हवा देण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी त्याची प्रचिती येण्याची शक्यता आहे.

संगमनेर शहरातून दररोज जमा होणार्या घनकचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने 1980 सालापासून संगमनेर खुर्दमधील सध्याच्या जागी डेपो सुरु केला होता. तेव्हापासून आजवर त्याच ठिकाणी कचर्याची विल्हेवाट प्रक्रिया होते. पूर्वी उघड्यावर असल्याने या परिसरात सतत दुर्गंधी व कुत्र्यांचा मोठा वावर असायचा. त्यातच पूर्वीचा पुणे-नाशिक महामार्गही या डेपोला खेटूनच जात असल्याने वर्दळही मोठी होती. त्यामुळे वारंवार अपघात, त्यातून घडणार्या दुर्दैवी घटना संगमनेरकरांना नियमित होत्या. गेल्या दशकापर्यंत जमिनीत खड्डे घेवून साठवलेला घनकचरा सडवला जायचा. काही दिवस ही प्रक्रिया सुरु राहत असल्याने त्यातील द्रवरुपाचे अंश जमिनीत उतरुन आसपासच्या परिसरातील जलस्रोत दुषित होवू लागले. त्यावरुन आंदोलनेही झाली.

पालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तेथील रहिवाशांना काहीअंशी दिलासा देत ही समस्या शांत ठेवण्यात यश मिळवले. मात्र आज सायंकाळी दीर्घकाळापासून शांत असलेल्या कृती समितीला बोटं लावणारी गोष्ट घडली. सायंकाळी सहाच्या सुमारास पालिकेच्या कचरा डेपोत साठवलेल्या कचर्याच्या एका ढिगाला अचानक आग लागली. कोणाला काही समजण्यापूर्वीच या आगीने झपाट्याने आसपासच्या ढिगांनाही कवेत घेण्यास सुरुवात केल्याने काही क्षणात आगीचे लोळ उठले. सायंकाळी सूर्यास्तानंतर पेटलेल्या कचर्यातून उंच लोळ उठू लागल्याने संगमनेर खुर्दच्या आसमंतात लखलखाट दिसू लागला आहे.

घटनेनंतर पालिकेच्या कर्मचार्याने अग्निशमन बंबांना पाचारण केले आहे. दोन बंबांच्या सहाय्याने सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे, मात्र अद्या आग आटोक्यात आलेली नाही. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कचरा पेटल्याने धुराचे लोळही उठले असून संपूर्ण परिसर काळवंडला आहे. या आगीचे तांडव बघून कचरा डेपोच्या परिसरात राहणार्या ीहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली असून त्यातून शांत असलेल्या कृती समितीलाही पुनरुज्जीवन मिळाले आहे. त्याचा परिणाम संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा कचरा डेपो विरोधात एल्गार पुकारताना उद्यापासून ‘गंटबंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर, उन्हामुळे अशा घटना घडतातच, येणार्या कालावधीत संगमनेर शहर ‘कचरामुक्त’ होईल अशी ग्वाही मुख्याधिकार्यांनी दिली आहे.

संगमनेर खुर्दच्या जागेत असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या कचरा डेपोला आम्ही सातत्याने विरोध केला आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयासह प्रदूषण महामंडळातही लढा दिला आहे. येथील कचरा डेपोतून निघणार्या दुर्गंधीसह जमिनीत उतरणार्या विषारी द्रव्यांमुळे जमिनींची उत्पादन क्षमता कमी होण्यासह पाण्याच्या माध्यमातून रहिवाशांच्या आरोग्य समस्याही निर्माण झाल्या आहेत. आता आगीच्या या भयानक प्रकारातून आमच्या सुरक्षिततेचाच प्रश्न उभा राहिल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे आम्ही या डेपोला विरोध करण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला असून कचरा डेपो हटाओ कृती समिती शुक्रवारी (ता.21) ‘गेटबंद’ आंदोलन करणार आहे, आम्ही एकही घंटागाडी इथे खाली होवू देणार नाही.
संतोष शिंदे
अध्यक्ष, कचराडेपो हटाओ कृती समिती

उन्हाळ्याच्या दिवसांत अंतर्गत गॅसेस तयार होवून कचर्याचे ढिग पेटण्याचा घटना घडतच असतात. काल-परवा घुलेवाडीतील कचरा डेपोलाही उष्णतेच्या कारणातून आग लागली होती. पालिकेच्या कचरा डेपोलाही आज सायंकाळी अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला असून अग्निशमन विभागाचे दोन बंब पाठवण्यात आले आहेत. लवकरच आगीवर पुर्णतः नियंत्रण प्राप्त होईल. या घटनेत कचरा जळण्याशिवाय कोणतेही नुकसान झालेले नाही. कचरा या विषयावर आपण आता खूप पुढचे पाऊल टाकणार आहोत. लवकरच संगमनेर शहर व संगमनेर खुर्दचा कचरा डेपो ‘कचरामुक्त’ होणार आहे. त्या दृष्टीने आपण वेगाने काम करीत आहोत.
रामदास कोकरे
मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद

