तालुक्याच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी पडली पंचवीस बाधितांची भर! कोविड संक्रमणाची गती मंदावल्याने काहीसा दिलासा, मात्र दुर्लक्ष केल्यास परिणाम जाणवणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडवरील लस बाजारात उपलब्ध होणार असल्याच्या वृत्तांनी नागरिकांमधील बिनधास्तपणा वाढल्याने संक्रमणाचा सिलसिला कायम आहे. देशात अद्याप लसीकरणाला सुरुवात झालेली नाही, त्यातही लस उपलब्ध झाल्यानंतर लगेचच ती संगमनेरसारख्या ग्रामीण शहरात उपलब्ध होण्याची शक्यता कमीच असल्याने संगमनेरकरांसाठी कोविडचा धोका आजही कायम आहे. त्याचेच वास्तव दर्शन दररोजच्या सरासरी रुग्णसंख्येतून दिसून येत आहे. शुक्रवारीही खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून समोर आलेल्या निष्कर्षात शहरातील पाच जणांसह एकूण 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत भर पडण्याचा प्रक्रीया अव्याहत राहतांना तालुका आता 5 हजार 737 वर पोहोचला आहे.
दिवाळीनंतर दुसर्याच दिवशी तालुक्यातील कोविडच्या संक्रमणाला काहीशी गती प्राप्त झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात उंचावत जाणारा कोविडचा आलेख चालू महिन्याच्या सुरुवातीपासून त्याच गतीने पुढे सरकू लागल्याने या महिन्यातही विक्रमी रुग्ण समोर येतात की काय अशी स्थिती दिसू लागली होती. 1 ते 8 डिसेंबर या पहिल्या आठ दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत सरासरी 36.25 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 290 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे या महिन्यातही बाधितांच्या संख्येत हजारापेक्षा अधिक रुग्णांची भर पडेल असे दिसू लागले होते. त्यातच थंडीचा कडाकाही वाढल्याने परिस्थिती थोडी चिंताजनक बनली होती.
मात्र 9 डिसेंबरपासून कोविड संक्रमणाच्या सरासरी गतीला काहीसा ब्रेक लागला. त्यामुळे चिंता दाटलेल्या चेहर्यांवर समाधानाच्या लकेरही उमटल्या. 9 ते 18 डिसेंबर या दहा दिवसांत संक्रमणाचा वेग तब्बल 11 रुग्ण दररोज या गतीने खाली आला आणि या कालावधीत 24.9 रुग्णांच्या सरासरीने 249 रुग्णांची भर पडली. चालू महिन्यातील एकूण रुग्णसंख्येची सरासरी बघितली असता सुरुवातीच्या आठवड्यातील वाढलेली सरासरी 6.25 ने कमी होवून ती 30 रुग्ण दररोज झाली आहे. गेल्या दहा दिवसांतील सरासरी बघता त्यात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र जो पर्यंत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत नाही तो पर्यंत कोविडबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
शुक्रवारी (ता.18) शहरासह तालुक्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्याचे दिसून आले. अर्थात गुरुवारचा अपवाद वगळता गेल्या 9 डिसेंबरपासूनची सरासरी शुक्रवारीही कायम राहीली. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून 19 तर खासगी प्रयोगशाळांच्या अहवालातून सहा अशा एकूण 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील विस रुग्णांचा समावेश आहे.
या अहवालातून शहरातील जनतानगर मधील 10 वर्षीय मुलगा, गणेशनगर परिसरातील 34 वर्षीय तरुण, कोष्टी गल्लीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रस्त्यावरील 29 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 47 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील पिंपरणे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शेडगाव येथील 32 वर्षीय तरुण, मुधळवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चंदनापूरी येथील 42 वर्षीय तरुण, झोळे येथील 43 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 54 वर्षीय इसमासह 51 वर्षीय महिला.
पेमगिरी येथील 35 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 31 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 55 वर्षीय इसम, काकडवाडीतील 16 व 14 वर्षीय मुली, घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगरमधील 70 वर्षीय महिला, जोर्वे येथील 42 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 59 वर्षीय इसम, देवगाव येथील 55 वर्षीय महिला व 47 वर्षीय इसम आणि नांदूरी दुमाला येथील 40 वर्षीय महिला असे एकूण 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून आता 5 हजार 737 वर पोहोचली आहे.
जागतिक पातळीवर कोविडवरील लस उपलब्ध झाली असून अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाची पूर्वतयारी सुरु असून येणार्या नववर्षात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. लस उलपब्ध होत असल्याने गेल्या 8-10 महिन्यांपासून कोविड नियम पाळणार्या अनेकांमध्ये शिथीलता आल्याचे दिसत आहे. मात्र असे केल्याने कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येणं अवघड होईल. त्यामुळे जो पर्यंत प्रत्यक्ष लसीकरण होत नाही तो पर्यंत कोविडकडे दुर्लक्ष न करता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.