जाणताराजा मैदानावरील झाडाला एकाचा फास संगमनेरातील धक्कादायक प्रकार; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणताराजा’ महानाट्याच्या निमित्ताने नामकरण झालेल्या मैदानातून धक्कादायक प्रकार समोर असून या घटनेत एका 55 वर्षीय इसमाने झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली आहे. अतिशय गजबजलेल्या उच्चभ्रू लोकवस्तीच्या परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेला हा प्रकार तब्बल दीडतासाने समजल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनील डॅनीयल बनसोडे असे आत्महत्या करणार्या इसमाचे नाव असून त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी झाडाला लटकलेल्या अवस्थेत असलेला त्याचा मृतदेह खाली उतरवून तो विच्छेदनासाठी पाठवला आहे. अतिशय वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेने मोठे आश्चर्य निर्माण केले असून नशेखोरीच्या प्रकारांसह आता येथील बेकायदा उद्योगात आत्महत्येच्या प्रकाराचाही समावेश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या दाट लोकवस्तीत असलेल्या जाणताराजा मैदानावर सदरची घटना घडली. सकाळी दहाच्या सुमारास या मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू परिसरात असलेल्या झाडांच्या दिशेला गेल्यानंतर तो घेण्यासाठी गेलेल्या मुलांना त्यातील वडाच्या झाडाला एक इसम लटकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. त्याची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतावस्थेत असलेल्या सदर इसमाचा मृतदेह खाली उतरवला. त्याने कापडाच्या साहाय्याने झाडाच्या फांदीला फास बांधला होता.
पोलिसांनी मयताची अंगझडती घेतली असता त्यातून काहीही हाती लागले नसून त्याने आत्महत्या का केली असावी याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र मयताचे नाव सुनील डॅनीयल बनसोडे (वय 55, रा.सुकेवाडी) असे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या मैदानावर दिवसभर मुलांची खेळण्यासाठी गर्दी असते. शिवाय या मैदानाचा वापर अनेकजण घरी येण्याजाण्यासाठी करीत असल्याने या मैदानावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यामुळे या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
राजस्थान युवक मंडळ व गीता परिवाराने 2003 साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणताराजा महानाट्याचे संगमनेरात आयोजन केले होते. त्यावेळी वेड्या बाभळींनी वेढलेल्या या मैदानाच्या साफसफाईचा शुभारंभ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांच्या हस्ते झाला होता. त्याचवेळी या मैदानाचे नामकरण ‘जाणताराजा’ असे करण्यात आले होते. नंतरच्या काळात या मैदानावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांचेही आयोजन होत आले आहे. सोबतच विस्ताराने मोठ्या असलेल्या आणि रात्रीच्यावेळी अंधारात डूंबणार्या या मैदानाचा वापर तळीरामांसह नशेबहाद्दरांकडूनही होवू लागला. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी वारंवार छापेही घातले. मात्र त्यानंतरही असे प्रकार सुरुच असताना आता त्यात आत्महत्येसारख्या प्रकाराची भर पडल्याने मोठे आश्चर्य निर्माण झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणार्या या मैदानावरील सर्वप्रकारचे गैरकृत्य बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आकाराने आयताकृती असलेल्या या भव्य मैदानावर सर्वात आधी 2003 मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणताराजा’ महानाट्याचे आयोजन झाले होते. तेव्हापासून या मैदानाची ओळख तशीच राहीली असून हे मैदान म्हणजे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांचे केंद्र बनले आहे. सोबतच या मैदानाचा वापर काहींकडून गैरकृत्यासाठीही होत असताना त्यात आता आत्महत्येसारख्या प्रकाराचीही भर पडल्याने या मैदानावरील विविध प्रकार चर्चेत आले आहेत.