राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात महिला ठार डोळासणे शिवारातील घटना; ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या मूळावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारों कोटी रुपयांचा खर्च करुन आकाराला आलेल्या ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्गावरील अपघांताची श्रृंखला आजही कायम असून रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका महिलाचा बळी गेला. सध्या महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असून त्यासाठी काही ठिकाणी वळण रस्ते देण्यात आले आहेत. त्यातूनच हा अपघात झाला असून नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या कारची त्याच लेनवरुन येणार्‍या आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की धडक देणार्‍या कारचा अक्षरशः चेंदा झाला व त्यात पुढील आसनावर बसलेल्या प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे पती आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर डोळासणे महामार्ग पोलिसांनी टोल कर्मचार्‍यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.


याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.9) दुपारी साडेचारच्या सुमारास डोळासणे शिवारातील बांबळे वस्तीजवळ घडली. 2017 साली वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या सिन्नर ते खेड या नूतनीकरण झालेल्या महामार्गाचे सध्या कॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे साकूर फाट्यापासून पुढे पुण्याच्या दिशेने अनेक ठिकाणी वळण रस्त्यांसह एकाच लेनवरुन दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यानुसार डोळासणे शिवारातील बांबळेवस्ती पसिरातही महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या नाशिककडून पुण्याकडे जाणार्‍या लेनला पुण्याकडून येणार्‍या लेनवर वळवण्यात आले आहे. एका बाजूची वाहतूक अचानक दुसर्‍या बाजूला वळवण्यात आल्याने आणि त्यातच पुण्याकडून येणार्‍या वाहनचालकांना मात्र त्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्यानेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.


रविवारी दुपारी गिरीश गिरमे (वय 35) हे त्यांची पत्नी प्राजक्ता (वय 30) व मुलगा वेदांत (वय 13, सर्व रा.सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे) यांच्यासह मारुती सियाझ (क्र.एम.एच.12/एल.पी.5556) मधून नाशिकहून पुण्याकडे निघाले होते. डोळासणे शिवारात नाशिक लेनवर कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने येथून पुढे काही किलोमीटरपर्यंत ही लेन पुण्याकडून येणार्‍या रस्त्याला जोडण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी पुण्याकडून येणार्‍या वाहनचालकांसाठी मात्र समोरुन वाहने येणार असल्याबाबत कोणताही सूचना अथवा दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे पुण्याहून येणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने या भागात अपघाताची कायम शक्यता असते. संबंधित रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराचा हाच हलगर्जीपणा गिरमे कुटुंबाच्या अपघाताला कारणीभूत ठरला.


गिरीश गिरमे यांनी डोळासण्याजवळ वळणरस्ता घेत काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनासमोर असलेल्या मालट्रकला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोची (क्र. एच.आर.55/ए.एन.6644) त्यांच्या कारला समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की भरधाव वेगात दोन वाहनांची एकमेकांशी टक्कर झाल्यानंतर कारचा अक्षरशः चेंदा होवून ती रस्ता दुभाजकावर फेकली गेली. दोन वाहनांच्या धडकेने मोठा आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांनी आणि काही वाहनधारकांनी तत्काळ तेथे धाव घेत याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांसह हिवरगाव पावसा टोलनाक्याला अपघाताची माहिती देत मदतकार्य सुरु केले.


या भीषण अपघातात कारचा दर्शनीभाग पुर्णतः दाबला गेल्याने त्यात चालकाशेजारील सीटवर बसलेल्या प्राजक्ता गिरीश गिरमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वाहन चालवणार्‍या गिरीश गिरमे यांच्यासह पाठीमागील आसनावर बसलेला त्याचा 13 वर्षीय मुलगा वेदांत गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही वेळातच पोहोचलेल्या महामार्ग पोलिसांनी टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेतून जखमी झालेल्या दोघांनाही संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, मयत प्राजक्ता गिरमे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेत एका महिलेचा नाहक बळी गेल्याने परिसरातील नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबाबत संताप निर्माण झाला आहे.


कधीकाळी ‘मृत्यूघंटा’ म्हणून वाहनचालकांना धडकी भरवणार्‍या पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरणानंतर 2017 साली हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र या रस्त्याचे काम सुरु असताना झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारातून ठेकेदाराने अनेक ठिकाणची अर्धवट कामं, उपरस्ते, भूयारी अथवा उड्डाणमार्ग गिळून टाकल्याने नूतनीकरणानंतरही गेल्या नऊ वर्षात या रस्त्याने शेंकडो निष्पाप नागरिकांचे बळी घेतले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले आहे. आता नऊ वर्षांनंतर या महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असताना पुन्हा एकदा ठेकेदाराचा हलगर्जीपणा मानवी जीवांच्याच मूळावर उठला असून वळणरस्ता देताना दोन्ही बाजूने आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार धरुन संबंधित ठेकेदारालाही सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी होत आहे.

Visits: 345 Today: 1 Total: 1419047

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *