सहकारी दूध संघामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी ः थोरात संगमनेर तालुका दूध संघाची 45 वी वार्षिक सभा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
1977 मध्ये तालुक्यात दूध व्यवसायाला सुरुवात झाली. त्यावेळी मोठी जनजागृती करण्यात आली. अनेक दिवसांच्या कष्टातून तालुक्यात दूध व्यवसाय उभा राहिला आहे. या दूध व्यवसायाने व सहकारी दूध संघामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली असून उत्पादकांनी खासगीच्या तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता सहकारी संघाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, अॅड. माधव कानवडे, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, गणपत सांगळे, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी, अर्चना बालोडे, मीरा शेटे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. गुणवत्ता, सात्विकता व प्रामाणिकपणा यामुळे राज्यभरात राजहंस दूध संघाचा लौकिक निर्माण झाला आहे. सूरत, गुलबर्गा, विदर्भ नागपूर, चंद्रपूर अशा अनेक विविध ठिकाणी दूध विक्री होत आहे. वर्षानुवर्षे केलेल्या प्रामाणिक कामातूनही हे यश मिळाले आहे. सध्या लंपी आजार वाढलेला आहे. अशा काळात किंवा पशुधन वाचविण्यासाठी 75 डॉक्टरांची टीम काम करत आहे. विविध योजना राबवल्या जात आहेत. या कामांमध्ये खासगीवाले कुठेही नसतात. मात्र ते एक-दोन रुपयाचे आमीष दाखवतात आणि काही लोक त्याला बळी पडतात. सहकारी संघ टिकला तरच वैभव टिकणार आहे. उत्पादकांना भाव मिळणार आहे. म्हणून तालुक्याच्या व सर्वसामान्यांच्या हिताकरीता सहकारी संस्था टिकल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे. याकरीता खासगी सेंटरकडे दूध न टाकता दूध उत्पादकांना मदतीची भूमिका ठेवणार्या सहकारी संघाच्या पाठिशी भक्कम उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, कोरोना काळामध्ये सर्व उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला याला आपला दूध संघही अपवाद नाही. त्या काळात दूध संघाने तयार केलेली पावडर स्टॉक होती. या आर्थिक वर्षात त्याची विक्री केली. मात्र उत्पादन खर्च आणि विक्री दरातील तफावत यामुळे त्याचा बोजा या वर्षात पडणार आहे. तसेच कोरोनामुळे विक्रीलाही फटका बसला असून डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो आहे. कोरोना संकटामुळे दूध विक्री कमी झाली आहे. नुकत्याच आलेल्या लंपी आजाराबाबत तालुक्यात गायींचे लसीकरण सुरु केले आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी साहेबराव गडाख, मोहनराव करंजकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, संचालक विलास वर्पे, भास्कर सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे, बादशाह वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, फायनान्स मॅनेजर गणपत शिंदे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.
