दोन्ही लोकप्रतिनिधींकडून अवलंबला जाणार मधला मार्ग? प्रशासनाला दोघांकडूनही अपेक्षा; आज उशिरापर्यंत समन्वयातून तोडगा निघणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या जन्मोत्सवाला संगमनेरात राजकीय वादाची किनार लागल्याने प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून दुसरीकडे दोन्ही लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन मधला मार्ग काढण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. सोमवारी पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत बसस्थानकावरील देखावा आणि मिरवणूक या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यातून मधला मार्ग निवडण्यात आल्याची माहिती असून दोन्ही लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचा हा उत्सव आनंदात आणि शांततेने साजरा व्हावा अशी अपेक्षाही या बैठकीतून व्यक्त करण्यात आली असून आज उशिरापर्यंत प्रशासनाच्या प्रस्तावानुसार अंतिम निर्णय समोर येण्याची शक्यता आहे.


पुढील आठवड्यात (ता.17) देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती (तीथीनुसार) साजरी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यात तयारीला वेग आला असताना संगमनेरात मात्र या उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात येणार्‍या देखाव्यांवरुन राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्याकाही वर्षात शहरात होणारी सामाजिक व राजकीय आंदोलने, आनंद सोहळे व महापुरुषांच्या जयंतीसाठी सर्वच पक्ष, संघटना व कार्यकर्त्यांना बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील जागाच हवी असल्याने शिवजयंतीचा वाद सध्या याच ठिकाणी केंद्रीत झाला आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर संगमनेर मतदारसंघात सक्रिय झालेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनीही यंदा पहिल्यांदाच तीथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा करण्याचा मानस करुन शिवजन्मोत्सव सोहळा समितीची स्थापना केली. या समितीने बसस्थानकाच्या परिसरात ‘शिवमंदिर’ उभारण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज दाखल केला असून शिवसेनेकडूनही किल्ल्याची प्रतिकृती निर्माण करण्यासाठी याच जागेवर दावा करण्यात आला आहे.


एकाच जागेवर दोन राजकीय गटांनी स्वतंत्र दावा केल्याने आणि बैठकीनंतरही दोन्ही गट आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने प्रशासनाच्या समन्वयातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांनाच खीळ बसली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही रविवारी (ता.9) शिवजन्मोत्सव सोहळा समितीने बसस्थानकावर येवून आपला देखावा उभारण्यासाठी भूमिपूजनाचा घाट घातल्याने मोठा राजकीय गदारोळ झाला होता. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांनी बसस्थानकाच्या परिसरात आरक्षित केलेल्या जागांचा ताबा घेतला असून जो पर्यंत परवानगीचा निर्णय होत नाही तो पर्यंत कोणत्याही गटाला आहे त्या स्थितीत बदल करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी दोन्ही गटांच्या आरक्षित जागेत पोलिसांची वाहने उभी करण्यात आली असून मोठा बंदोबस्तही तैनात आहे.


एकीकडे देखाव्यांच्या उभारणीसाठी बसस्थानकाच्या जागेवरुन राजकीय संघर्ष सुरु असतानाच दुसरीकडे जवळपास गेल्या पाच दशकांपासून शिवसेनेकडून निघणारी सायंकालीन मिरवणुकही चर्चेत आली आहे. खरेतर राज्यात तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंती उत्सवावर आजपर्यंत शिवसेनेचाच पगडा बघायला मिळाला आहे. मात्र यावेळी राज्यासह संगमनेरात बदललेल्या राजकीय स्थितीमुळे या मिरवणुकाही चर्चेत असून त्यात संगमनेरचाही समावेश झाला आहे. यावेळी पालिकेपासून निघणार्‍या या मिरवणुकीवर अधिकृत शिवसेना म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या शिंदेगटाकडून अर्ज दाखल होण्यासह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळानेही परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून मात्र पोलीस प्रशासनाकडे कोणताही अर्ज दाखल नसल्याने एकप्रकारे त्यांनी शिंदेसेनेच्या मिरवणुकीला मूक समर्थन दिल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मिरवणुकीचा प्रश्‍न सोडवताना प्रशासनाला फारकाही प्रयोग करावे लागणार नसले तरीही बसस्थानकावरील जागेचा वाद मात्र कळीचा मुद्दा ठरला आहे.


यासर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.10) पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाने एकत्रित बैठक घेतली होती. या बैठकीत संगमनेरच्या शिवजयंती उत्सवाचा इतिहास, समोर आलेले परवानगीचे अर्ज आणि त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यस्थेची स्थिती यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर दोन्ही लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून बसस्थानकाच्या आवारातील जागेत शिवजन्म सोहळा समितीचे शिवमंदिर उभारण्यासाठी परवानगी देण्यावर विचार झाल्याचे समजते. सोबतच तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीला गेल्या पाच दशकांपासून शिवसेनेच्यावतीनेच मिरवणूक निघत असल्याने त्याची परवानगी शिवसेनेलाच देण्यावरही एकमत झाल्याचे समजते. याबाबत आमदार सत्यजीत तांबे व आमदार अमोल खताळ या दोघांशीही चर्चा करुन प्रशासन मधल्यामार्गाची अंमलबजावणी करणार असून आज उशिरापर्यंत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.


छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आपण सगळे आज आहोत. त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव साजरा करताना तो त्यांना साजेसाच व्हावा अशी सामान्य संगमनेरकराची अपेक्षा आहे. सध्या तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर अनुभवायला मिळत असला तरीही प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असलेला हा जन्मसोहळा त्यापासून दूर राहीला पाहिजे असे बहुतेकांचे मत आहे. त्यासाठी दोन्ही लोकप्रनिधींनी एक पाऊल मागे येण्याची गरज असून बस्थानकावर उभ्या राहणार्‍या राज्यातील पहिल्या शिवमंदिरात छत्रपतींसमोर नतमस्तक झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित सायंकाळच्या मिरवणुकीतही सहभागी व्हावे व हा उत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहनही केले जात आहे.

Visits: 416 Today: 6 Total: 1591488

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *