जागेच्या वादात अडकला जाणता राजाचा जन्मोत्सव! प्रशासनाची डोकेदुखीही वाढली; सामंजस्याच्या भूमिकेतून मध्यममार्गाचे प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जन्मोत्सवाला संगमनेरात वादाची किनार लागली आहे. दरवर्षी तीथीनुसार साजर्या होणार्या या उत्सवावर शिवसेनेचा पगडा असतो. मात्र गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात घडलेल्या घडामोडी, एकसंध शिवसेनेची उडालेली शकलं आणि संगमनेरात झालेल्या राजकीय परिवर्तनाने यावेळच्या शिवजयंती उत्सवाला अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातूनच प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यासाठीची जागा आणि पारंपरिक मिरवणुकीचा विषय चर्चेत आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटांसह ‘शिवजन्मोत्सव सोहळा समिती’नेही आपला हक्क सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत असतानाच रविवारी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवसेना आणि जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मोठा तणावही निर्माण झाला होता. त्यातून प्रशासनाची डोकेदुखीही वाढली असून सामंजस्यातून मध्यममार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहराला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहरात साजर्या होणार्या विविध सण-उत्सवातून त्याचे प्रतिबिंबही दरवर्षी बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी राज्यात गणेशोत्सव आणि शिवजयंती या दोन उत्सवांना सार्वजनिक स्वरुप दिल्यापासून संगमनेरात हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मात्र दोन-अडीच दशकांपूर्वी शिवजयंती उत्सव तारखेनुसार साजरा करावा की तीथीनुसार यातून भिन्न मतप्रवाह समोर येवून वादंग निर्माण झाल्याने तत्कालीन राज्य सरकारने इतिहासाच्या अभ्यासकांची समिती तयार करुन अभिप्राय मागवला होता. त्यातून जन्मतारीख माहिती नसलेल्या दैवतांचा उत्सव तीथीनुसार साजरा केला जात असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाल्याने त्यांची जयंती याच तारखेला साजरी करावी असा अभिप्राय समितीने सोपवला.

तेव्हापासून राज्यात दोनवेळा शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा प्रघात असून तारखेनुसार साजर्या होणार्या उत्सवाला ‘शासकीय’ तर, तीथीनुसार साजर्या होणार्या उत्सवाला शिवसेनेचा उत्सव म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होवून कधीकाळी एकसंध असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पदरात टाकल्याने आजच्या स्थितीत शिंदेसेनेलाच खरी शिवसेना म्हणून ओळखले जाते. त्यातही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात ऐतिहासिक बहुमत मिळवण्यासह संगमनेरातही परिवर्तन घडवून आणल्याने तालुक्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष रोजच बघायला मिळत आहे.

त्याचे पडसाद आता महाराष्ट्राच्या जाणता राजाच्या जन्मोत्सवावरही उमटू लागले असून यंदा पहिल्यांदाच विरोधीगटाने पुढाकार घेत शहरातील शिवप्रेमींना एकत्रित करीत ‘शिवजन्मोत्सव सोहळा समिती’ची स्थापना केली आहे. सदरची समिती गैर राजकीय असल्याचे सांगितले जात असले तरीही या समितीचे नेतृत्व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे, आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे असल्याने त्याला राजकीय किनार लागली आहे. या समितीने बसस्थानकाच्या आवारात ‘शिवमंदिर’ उभारण्यासाठी पोलिसांकडून परवानगी मागितली आहे. त्याचवेळी शिवसेनेकडूनही याच जागेवर दावा ठोकण्यात आला असून पारंपरिक पद्धतीने शिवसेनेकडूनच तीथीनुसार शिवजयंती साजरी होत असल्याने बसस्थानकावरील जागेसह सायंकाळी निघणार्या पारंपरिक मिरवणुकीवरही त्यांच्याकडून दावा ठोकण्यात आला आहे.

एकीकडे समिती आणि शिवसेना यांच्या वादात बसस्थानकावरील जागा अडकलेली असताना दुसरीकडे शिवसेनेच्या पारंपरिक मिरवणुकीवर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळानेही दावा केला आहे. मंडळाच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून सदरची मिरवणूक काढली जात असल्याचे सांगत त्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बसस्थानकावरील जागेसह शिवसेनेची पारंपरिक मिरवणुकही वादाच्या गर्तेत आली आहे. अशास्थितीत कोणाला परवानगी द्यावी?, त्यातून शहराची शांतता व सुव्यवस्था कशी अबाधित राखावी यावरुन प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे शहरात शिवसेनेची स्थापना झाल्यापासून गेली पाच दशके या मिरवणुकीवर शिवसेनेचा पगडा आहे. त्यासाठी शिंदेगटाकडून परवानगीचा अर्ज दाखल झालेला असताना उद्धव ठाकरे गटाकडून मात्र कोणताही दावा नसल्याने आश्चर्यही निर्माण झाले आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा समितीसह शिवसेनेकडूनही बसस्थानकावरील जागेबाबत केलेल्या अर्जावर कोणताही निर्णय झालेला नसताना रविवारी (ता.9) दुपारनंतर समितीच्या सदस्यांनी भूमीपूजन करुन शिवमंदिराच्या उभारणीस सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरच्या गोष्टीला शिवसेनेकडून कडाडून विरोध होत मोठ्या संख्येने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येवून घोषणाबाजी सुरु झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूने जागा अडवण्यासाठी उभारलेल्या ‘बॅरिकेट्सचा’ ताबा घेतला असून तेथे राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा संगमनेरात साजरा होणारा राजांचा जन्मोत्सव राजकीय वादात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संगमनेर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाच्या अखेरच्या काळात सन 1679 च्या उत्तरार्धात त्यांच्या पदस्पर्शाने येथील भूमी पावन झाली आहे. शहरात गावपातळीवर साजरा होणारा श्रीराम व श्री हनुमान जन्मोत्सव, गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवातून दरवर्षी त्याचे सांस्कृतिक प्रतिबिंबही बघायला मिळते. त्यामुळे या उत्सवांना राजकीय वादापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे सामान्य संगमनेरकरांमधून बोलले जावू लागले असून दोन्ही बाजूच्या प्रमुखांनी एकत्रित बसून सामंजस्याने त्यातून मध्यममार्ग निवडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनानेही त्यादृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली असून आज (ता.10) सकाळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे, तहसीलदार धिरज मांजरे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी प्रशासकीय बैठकही घेतली आहे. मंगळवारी (ता.11) दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्यातून मार्ग काढण्याचा अंतिम प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाकडून आपला निर्णय जाहीर केला जाणार आहे.

संगमनेर शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात तीथीनुसार साजरा होणारा उत्सवही दिमाखदारपणे आणि शांततेत साजरा व्हावा अशी सामान्य संगमनेरकरांना अपेक्षा आहे. यावेळी या उत्सवावरुन दोन गट पडल्याने आणि त्यांच्याकडून एकाच ठिकाणच्या जागेवर स्वतंत्र दावा केला गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र दोन्ही गटांनी सामंजस्यातून एक-एक पाऊल मागे येवून राजांच्या या उत्सवाला गालबोटं लागणार नाही यासाठी पुढाकार घेवून निर्णय घेण्याची गरजही आता व्यक्त केली जात आहे.

