‘कुंभमेळ्या’च्या पर्वातही अमृतवाहिनीतून वाहतंय रक्तमांस! हजारोंच्या आरोग्याशी उघड खेळ; ‘सिंहस्था’पूर्वी समूळ उच्चाटणाची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतकुंभातील चार थेंब पडल्याने पावन झालेल्या प्रयागराज कुंभमेळ्याची जगभरात चर्चा सुरु असतानाच साक्षात अमृत घेवून प्रवाहित झालेल्या अमृतवाहिनीला मात्र दुषीत करण्याचे पद्धतशीर षडयंत्र आजही सुरु आहे. संगमनेरात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर गेल्या प्रदीर्घ काळापासून सुरु असलेला हा प्रकार थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ती फोल ठरत असल्याचे अलिकडच्या काळात झालेल्या कारवायांमधून दिसून आले आहे. सह्याद्रीच्या शिखरावरुन प्रवाहीत झालेल्या अमृवाहिनीला खूप मोठा इतिहास आहे. नाशिकच्या सिंहस्थानंतर परतणार्‍या दक्षिणेतील नागा साधूंची मोठी झूंड अमृतवाहिनीत डूबकी मारल्याशिवाय मार्गस्थ होत नाही इतकी या प्रवाहाची महती आहे. मात्र वाळू तस्करांपाठोपाठच आता ‘काही’ कसायांकडून बेकायदा गोवंशाच्या कत्तलीतून बाहेर पडणारे टाकावू रक्तमांस शहरालगतच्या फादरवाडी परिसरासह थेट प्रवरापात्रातच टाकले जात आहेत. सोबतच नदीकाठावरील शेतकर्‍यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनीत अशा अवयव गाडण्याचे प्रकारही वाढल्याने आसपासचे जलस्रोत दुषीत होवून हजारोंचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रार करुनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर तेथील रहिवाशांसह बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर पालिकेसह पोलिसांनी अ‍ॅक्शनमोडमध्ये येत फादरवाडीतील सुभाष गुलाब मेहेत्रे आणि त्याचा मुलगा अविनाश अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारातून संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने पुन्हा एकदा चर्चेत आले असून सिंहस्थापूर्वी अशा प्रकारांचे समूळ उच्चाटण करुन हजारों नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला हा खेळ थांबवण्याची गरजही समोर आली आहे.


दशकभरापूर्वी आघाडीची सत्ता जावून महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला. त्यापूर्वी फक्त गोहत्या करण्यास मनाई होती. मात्र या कायद्याने जर्शी गार्यीपाठोपाठ गोर्‍ह्यांनाही संरक्षित केल्याने बेकायदा कत्तलखान्यांची संख्या वाढली. संगमनेरातून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, हैद्राबाद, गुलबर्गा अशा कितीतरी ठिकाणी दररोज गोवंशाच्या मांसाचा पुरवठा केला जातो. हा व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. या दरम्यान पोलिसांकडून कारवाया, गुन्हे, अटक, मोर्चे, आंदोलने असे सगळे प्रकार झाले. मात्र या बेकायदा कत्तलखान्यांचे कोणीही उच्चाटण करु शकले नाही. राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळण्यासह संमनेरातही परिवर्तन घडल्याने काही वर्षांपूर्वी गोवंश हत्योच्या विरोधात आग्रही असलेले नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवतील असे अपेक्षित होते. मात्र असा कोणताही प्रकार अद्याप समोर आलेला नाही.


अशातच सततच्या दादागिरीतून स्थानिकांचा विरोध डावलून बळजबरीने थेट नदीकाठावर व वाहत्या प्रवाहात अस्तव्यस्त गोवंशाचे रक्तमांस फेकणार्‍या कसायांनी स्थानिक दोघा शेतकर्‍यांना पैशांचा लोभ दाखवून त्यांच्याच जमिनीत मोठ्या प्रमाणात टाकावू अवयव गाडलेही. त्यातून त्याचा अंश जमिनीत उतरुन आसपासच्या परिसरातील जलस्रोत दुषीत झाल्याने सेंटमेरी स्कूल व फादरवाडी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून रहिवाशी आक्रमक झाले आहेत. त्याला बजरंगदलाचीही साथ मिळाल्याने स्थानिकांनी ‘काही’ कसायांची दहशत झुगारुन आंदोलनाचे हत्यार उपसले. पालिका प्रशासक रामदास कोकरे यांनी तत्काळ पावलं उचलताना पथकाद्वारे पाहणी करुन अहवाल मागवला. त्यात वरील परिसरातील दोन प्लॉट क्रमांकांमध्ये खड्डे घेवून मोठ्या प्रमाणात मेलेल्या व कुजलेल्या जनावरांच्या अवयवांसह लगतच वाहणार्‍या नदीपात्रातही ते टाकण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकारातून आसपासचे जलस्रोत दुषीत झाल्याचे निरीक्षणही पथकाने आपल्या अहवालात नोंदवले.


त्यानुसार प्रशासकांनी शहर पोलिसांना कारवाईबाबत पत्र लिहिल्यानंतर पोलीस पथकानेही प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे यांच्या फिर्यादीवरुन सेंट मेरी शाळेजवळ राहणार्‍या सुभाष गुलाब मेहेत्रे आणि त्याचा मुलगा अविनाश अशा दोघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 279, 280, 293 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतूदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतून वारंवार कारवाया होवूनही काही कसाई बेकायदा गोवंशाच्या कत्तलीसह त्यातून निघणार्‍या टाकावू अवयवांची पद्धतशीर विल्हेवाट न लावता आपल्या पोटापाण्यासाठी हजारोंच्या आरोग्याशी खेळत थेट शेकडों जलस्रोतांचा आधार असलेल्या प्रवरापात्रात आणि त्यालगतच्या शेतजमिनीत ते गाडीत आहेत. हा प्रकार हजारोंच्या आस्थेला धक्का लावणाराही असून ऐन महाकुंभाच्या पर्वात साक्षात अमृतवाहिनीच्या पात्रातून गोवंशाचे रक्तमांस वाहत असल्याने संताप व्यक्त होवू लागला आहे. पोलिसांनीही केवळ गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार न करता या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून त्याच्या मूळाशी जाण्याची गरज आहे.


विष्णुपुराणातील उल्लेखानुसार राऊ नावाच्या दानवाने वेशांतर करुन अमृत ग्रहण केल्यानंतर श्रीहरी नारायणांनी सुदर्शन चक्राने त्यांचे धड वेगळे करुन आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याचा कंठ दाबला. त्यामुळे त्याने प्राशन केलेले संपूर्ण अमृत बाहेर पडून ते ज्या मार्गाने वाहून गोदावरीला मिळाले तो प्रवाह म्हणजे अमृतवाहिनी. अंगठ्याने प्रवाहित झाली म्हणून तिला प्रवरा म्हणूनही संबोधले जाते. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर अमृतकुंभातील केवळ चार थेंब पडले होते. मात्र संगमनेरातून वाहणार्‍या साक्षात अमृतवाहिनीत जणू जाणीवपूर्वक गोवंशाचे रक्तमांस टाकले जात आहे. त्यातून हजारोंच्या आस्थेला ठेच लागण्यासह लोकांच्या आरोग्याशीही उघड खेळ सुरु असल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कायदा होवून दहा वर्षांचा काळ उलटत असतानाही संगमनेरात अव्याहत सुरु असलेल्या बेकायदा कत्तलखान्यांचे नाशिकच्या सिंहस्थापूर्वी समूळ उच्चाटण व्हावे अशी मागणीही आता समोर येत आहे.

Visits: 130 Today: 2 Total: 1099202

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *