देडगाव-माका शिवारात पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या! नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील देडगाव येथील अपहरण झालेल्या सत्यम संभाजी थोरात या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह देडगाव-माका शिवारातील शेतात तब्बल सहा दिवसांनी सोमवारी (ता.25) सायंकाळी सापडला. त्याचे दोन्ही हात, उजवा पाय घोट्यापासून तोडलेला व गळा चिरलेला होता. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
देडगाव येथे बुधवारी (ता.20) यात्रा होती. त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सत्यमचे अपहरण झाले होते. तशी फिर्याद त्याची आजी प्रमिला शिवाजी थोरात यांनी नेवासा पोलिसांत दिली होती. सोमवारी (ता.25) सायंकाळी देडगाव-माका शिवारातील एका शेतकर्यास सत्यमचा मृतदेह शेतात आढळला. त्याने याबाबत देडगावच्या सरपंच यांना माहिती दिली. सरपंचांनी नेवासा पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत नेवासा फाटा येथे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, घटनास्थळाला पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रमिला थोरात यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी आरोपी गणेश शेषराव मोरे, रमेश शेषराव मोरे, प्रमोद अंकुश थोरात, विनायक अंकुश थोरात (सर्व रा. देडगाव, ता. नेवासा) या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
संशयित गणेश व रमेश मोरे बंधू यांचे वडील शेषराव पांडुरंग मोरे (वय 50) व मृत सत्यमचे वडील संभाजी थोरात यांचा दारूच्या नशेत ऑक्टोबर 2019 मध्ये वाद झाला होता. त्यात थोरात यांनी शेषराव मोरे यांचा लाकडी दांडक्याने ठेचून खून केला होता. याप्रकरणी थोरात यांना शिक्षाही झाली. त्यामुळे सत्यमच्या हत्येच्या संशयाची सुई सहाजिकच मोरे बंधूंकडे वळते. असे असले तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. दरम्यान, या निर्घृण हत्येचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (ता.26) दुपारी एकलव्य संघटनेच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले.
अपहरण झालेल्या सत्यमची हत्या झाली असून, याप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे. हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, हे तपासादरम्यान उघड होईल.
– बाजीराव पोवार (पोलीस निरीक्षक, नेवासा)